पुणे : प्रेमविवाहात सर्वाधिक काडीमोड; दहापैकी सहा ते सात जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात

पुणे : प्रेमविवाहात सर्वाधिक काडीमोड; दहापैकी सहा ते सात जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लग्नानंतर विविध कारणांमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊन लग्नाच्या रेशीमगाठी न्यायालयात येऊन तोडल्या जातात. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात गेल्या काही वर्षांत घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून यामध्ये जुळविलेल्या लग्नापेक्षा प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण वकील वर्गाकडून नोंदिवण्यात आले आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. काही मुलं आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुला-मुलीशी लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. संसारादरम्यान भांड्याला भांडं लागतचं. मात्र, काही दाम्पत्यांमधील वाद इतके विकोपाला जातात की, घटस्फोटापर्यंत टोकाची पायरी गाठली जाते.

घरच्यांनी जुळविलेल्या लग्नापेक्षा प्रेमविवाह करणार्‍या दाम्पत्यांमध्ये लग्नानंतर परस्पर नातेसंबंधांमधील वाढते ताणतणाव, बदलत्या अपेक्षा, एकमेकांना वेळ देता न येणे, वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे न्यायालयाची पायरी चढून घटस्फोटाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येते.

अ‍ॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, 'विवाहापूर्वी वागणे वेगळे होते, लग्नानंतर ते बदलले हे प्रमुख कारण घेऊन बहुतांश जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करतात. लग्नानंतर त्यांच्यावर जबाबदारी पडते. मात्र, त्या दोघांनाही त्याची जाणीव सहसा होत नाही. बहुतांश प्रेमविवाहामध्ये नवरा व बायको हे दोघेही कमावते असतात, त्यामुळे त्यांना जुळवून घेणे ही वृत्ती मान्य नसते, ही एक वृत्ती प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांमध्ये दिसून येते.

अ‍ॅड. आकाश मुसळे म्हणाले, प्रेमविवाहात महाविद्यालय अथवा कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेम व त्यांतर लग्न होते. कामावर जाण्यास सुरुवात झाल्यानंतर घरातील विविध कामांपासून पगारातील तफावत, खरेदी, कामाची वेळ आदी विविध गोष्टींमुळे वाद होतात. हे वाद विकोपाला गेल्यानंतर घटस्फोटाची पायरी चढली जाते. याउलट, घरच्यांनी जुळविलेल्या लग्नात वाद सुरू झाल्यानंतर तत्काळ मध्यस्थींमार्फत समजूत घालून तडजोड करण्यात येते. त्यामुळे घरच्यांनी जुळविलेली जोडपी न्यायालयात येण्याचे प्रमाण तुलनेने कमी राहते.

प्रेमविवाहातील घटस्फोटाची कारणे
पगारातील विषमता
विभक्त कुटुंबपद्धती
कामाच्या वेळांमुळे तुटत चाललेला संवाद
नातेवाईकांचा होणारा हस्तक्षेप
वैवाहिक आयुष्याची उशिरा सुरुवात
जोडीदाराकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news