
तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: तळेगाव स्टेशन परिसरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरु असुन भाविकांची लगबग सुरु आहे. टेल्को कॉलनी येथील आई तुळजा भवानी मंदिर प्रतिष्ठान, जय संतोषी माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर, उमराळी देवी मंदीर तसेच इंद्रायणी वसाहती मधील शिव छत्रपती क्रिडा प्रतिष्ठानचे सप्तशृंगी माता मंदीर आदी ठिकाणी रंगरंगोटी करणे, मंडप टाकणे, विद्युत रोषणाई करणे, परिसर सुशोभित करणे अशी कामे अंतीम टप्प्यात आलेली आहेत.
तसेच दांडीया, गरबाचेही नियोजन सुरु आहे. घरोघरीही घटस्थापना करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येत आहे. ज्वारी, बाजरी, गहू, मुग, मटकी, हरभरा, जवस, सातू, हळीव अशी वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य काळ्या मातीत मिसळून त्यावर घट आणि श्रीफळ ठेवून नागवेलीच्या पानाची माळ लावणे अशा प्रकारे घटस्थापना करण्याची तयारी केली जात आहे.