वडगाव मावळ : महाराष्ट्राच्या तरुणांवर का वार करता? ‘वेदांता- फॉक्सकॉन’वरून आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : घटनाबाह्य नाकर्ते खोके सरकार सत्तेवर आले आणि गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी मौके पे मौका मारला आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाळणार्या खोके सरकारचे उद्योगमंत्री राजीनामा देण्याऐवजी कोट घालून फिरत आहेत, अशी टीका करत या गद्दारांनी आमच्यावर 40 वार केले, पण आता महाराष्ट्राच्या तरुणांवर का वार करता? असा सवाल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास जबाबदार असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ शनिवारी (दि.24) वडगाव मावळ येथे शिवसेनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, उपनेते रघुनाथ कुचिक, रायगड संपर्कप्रमुख बबन पाटील, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, जिल्हा युवा सेना अधिकारी अनिकेत घुले आदी उपस्थित होते.
या वेळी आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉनसारखे इतर मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्यास हे शिंदे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करून शिंदे सरकारवर निशाणा साधला. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक सवलती दिल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार असते, तर हा प्रकल्प आम्ही जाऊच दिला नसता. मात्र या खोके सरकारने सत्तेत येताच दिल्लीस्वारांपुढे पायघड्या घालत लाखो युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला घालवला, असा आरोप केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा दिल्लीला गेले, त्यांनी जावे पण स्वतःच्या नाही महाराष्ट्राच्या हितासाठी जावे, अशी टिपण्णीही त्यांनी केली. आजचे आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांचा आक्रोश आहे. हे खोके सरकार आपल्यालाही खोके मागतील या धास्तीने उद्योग महाराष्ट्रात यायला घाबरत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा काळ असूनही अडीच वर्षांत सुमारे साडेसहा लाख रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली होती. परंतु, या नाकर्ते सरकारने ती घालवली, असा आरोप ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांना तरुणांनी आमच्या हक्काचा रोजगार तुम्ही का पळवून लावला, याचा जाब या शिंदे सरकारमधील पदाधिकार्यांना विचारण्याची वेळ आली आहे. आपल्या हाताचा रोजगार पाळणार्या या नाकर्ते सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असेही आवाहन ठाकरेंनी केले.