पुणे महापालिका परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | पुढारी

पुणे महापालिका परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत 448 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, परीक्षेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 26 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर यादरम्यान विविध पदांसाठी परीक्षा होणार असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले. महापालिकेत 2014 पासून नवीन भरती झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून, पालिकेचा संपूर्ण डोलारा कंत्राटी कामगारांवरच सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक कनिष्ठ अभियंते, विधी अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक आणि लिपिक आदी पदांसाठी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या भरतीसाठी 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी 87 हजार 471 अर्ज प्राप्त झाले. आता महापालिका प्रशासनाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, सोमवारी (दि. 26) पहिला पेपर होणार आहे.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी सोमवारी (26 सप्टेंबर), तर कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) या पदांसाठी 3 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. तसेच, 4 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी, तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होणार आहे.

मेरिटमध्ये येणार्‍यांची थेट नियुक्ती
10, 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी लिपिकपदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा देण्यासाठी उमेदवारास एसएमएस आणि ई-मेलद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड पाठविला जाणार आहे. तो युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतरच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मेरिटमध्ये येणार्‍या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून त्यांची थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नसल्याचे इथापे यांनी सांगितले.

Back to top button