ती विनवणी करत होती, आईला नका ना मारू पप्पा ! परंतु नशेत असलेल्या निर्दयी बापाने विचार न करता मुलीवर झाडली गोळी | पुढारी

ती विनवणी करत होती, आईला नका ना मारू पप्पा ! परंतु नशेत असलेल्या निर्दयी बापाने विचार न करता मुलीवर झाडली गोळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दारू पिऊन दारूच्या नशेत घरी आल्यावर पतीचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले.  वाद होत असतानाच पतीने स्वतः जवळ असणारे पिस्तूल बाहेर काढून थेट पत्नीवर मारण्यासाठी रोखले. हा वाद होत असताना त्यांची आठ वर्षांची मुलगी ,”पप्पा, आईला नका ना मारू!” असे हात जोडून जोरात ओरडत आतमध्ये आली. परंतु वडिलांनी कोणताही विचार न करता पोटच्या मुलीवरच गोळी झाडली.

या घटनेत आठ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे या घटनेत जखमी झालेल्या मुलीचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरची घटना पुण्यातील नऱ्हे या भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पांडुरंग तुकाराम उभे (वय. 38, रा. रुद्रांगण सोसायटी, नऱ्हे,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांडुरंग उभे हे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. यामुळे त्याने सुरक्षेच्या कारणास्तव परवाना असलेले रिव्हॉल्वर घेतलेले आहे. सध्या घडीला त्याचा व्यवसाय डबघाईला आल्याने तो आर्थिक समस्येत आहे. त्यात त्याला दारुचे व्यसन आहे. २३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग उभे हा दारुच्या नशेत घरी आला. पत्नी आणि घरातील इतरांसोबत किरकोळ कारणावरून वाद घालू लागला. घरातील लोकांमुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो, आज तुम्हाला कायमचे संपवून टाकतो, असे म्हणत त्याने आपल्या कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले आणि पत्नीवर जिवे मारण्यासाठी रोखले.

आपल्या आईचा जीव धोक्यात आहे हे पाहून आठ वर्षांची राजनंदिनी ओरडत आतमध्ये आली. आईला मारू नका ! असे वडिलांना म्हणू लागली. मात्र, मुलीच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कोणताही विचार न करता निर्दयी बापाने चिमुकलीवर गोळी झाडली. झाडलेली गोळी राजनंदिनीच्या छातीत डाव्या बाजूला लागली आणि ती जागीच कोसळली. अचानक झालेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या राजनंदिनीला पाहून लगेचच भारती हॉस्पिटलला दाखल केले. तिथेच सध्या तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनच्या पोलिस आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलीस निरीक्षक शैलेश संखे, जयंत राजुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, अस्मिता लाड, अशोक सणस आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

Back to top button