मुले पळविणार्‍या टोळीची अफवा; मुंढवा परिसरात मोबाईलवर मेसेज | पुढारी

मुले पळविणार्‍या टोळीची अफवा; मुंढवा परिसरात मोबाईलवर मेसेज

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: मुलांचे अपहरण करणारी टोळी परिसरात आली आहे, असे मेसेज सध्या सर्वत्र फिरत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण पोलिस प्रशासनाने दिले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून अनेक नागरिकांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर हे मेसेज, तसेच काही व्हिडिओ येत आहेत. त्यामुळे पालक मुलांना बाहेर खेळण्यासाठी, शाळेच्या बसमध्ये, तसेच क्लास व शाळाबाह्य उपक्रमांसाठी स्वतः सोडविण्यास जात आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका, अशी सक्त ताकीददेखील पालकांनी मुलांना दिली आहे.

घोरपडी, मुंढवा, केशवनगर, कोरेगाव पार्क आणि परिसरातील अनेक मुले ही बसमधून शाळेमध्ये जातात. ही अफवा पसरल्यापासून शाळांनी देखील काळजीचा भाग म्हणून मुलांना बसमध्ये सोडविण्यासाठी तसेच शाळेमधून माघारी येताना बसमधून घेण्यासाठी पालकांनी येणे आवश्यक असल्याची सक्ती केली आहे.

मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, ही अफवा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी. अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे.
                                            – अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
                                                         मुंढवा पोलिस ठाणे

पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना पालकांनी शाळेमध्ये सोडवण्यास व घेण्यास यावे. तसेच, दहावीपर्यंतच्या मुलांनी शाळेमध्ये येताना व जाताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क करू नये, अशा सूचना आम्ही मुलांना व पालकांना दिलेल्या आहेत.
                                                 – व्ही. एस. बारवकर, मुख्याध्यापक,
                                                     आदर्श विद्यालय दळवीनगर.

Back to top button