
सांगवी/मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : देशवासियांच्या आर्थिक उन्नतीसाठी व निरोगी आयुष्यासाठी अष्टविनायक मोरगाव (ता. बारामती) येथील मयुरेश्वराला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साकडे घातले. तसेच त्यांनी येथील आरोग्य केंद्राची पाहणी करून कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मंदिर आणि आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शुक्रवारी (दि. २३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यानिमित्त आल्या होत्या. त्यांनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर मयुरेश्वर मंदिरात दर्शन घेतलं.
यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, आ. बाळा भेगडे, कांचन कुल, अंकिता पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब गावडे, वासुदेव काळे, पांडुरंग कचरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघचौरे, सरपंच निलेश केदारी, पोपट तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे औक्षण करून पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार करीत अभिषेक-पुजा व श्रींची आरती केली. त्यानंतर प्रदक्षिणा घालून मंदिराची पाहणी करून पुराणतेविषयी व व्यवस्थापनाची माहिती घेतली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी सीतारामन यांचा शाल, श्रींची प्रतिमा देऊन सन्मान केला.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देताना निर्मला सीतारामन यांनी येथील सोयीसुविधांची पाहणी करून येथील कामकाजाची माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी ऐकून घेऊन गरोदर मातांना मिळणाऱ्या सुविधांची विचारपूस केली. दरम्यान, आरोग्य केंद्र आणि मयुरेश्वर मंदिरातील कामकाज व सोयीसुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.