
राजेंद्र खोमणे
नानगाव : पारगाव सा.मा. येथे नुकतीच गुर्हाळ चालक, मालक व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी सर्वांनी एकमताने गुर्हाळात प्रदूषण होणार्या वस्तू न जाळण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय गावाच्या आरोग्यासाठी हिताचा आहे. घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असून 'आपले गाव, आपले आरोग्य'ची जनजागृती गावात झाली आहे. असा निर्णय प्रत्येक ठिकाणी झाल्यास आपल्या गावाचे आरोग्य आपण नक्कीच चांगले ठेवू शकतो.
येथे गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर गुर्हाळ व्यवसाय सुरू आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या गुर्हाळात जळणासाठी चोतर्या वापरल्या जात होत्या; मात्र गेल्या काही वर्षांपासून काही गुर्हाळांवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, टायर, चपला व इतर कचरा जाळला जाऊ लागला. त्यामुळे गुर्हाळ भागात धुराच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
यासंदर्भात मागील ग्रामसभेत अशा प्रदूषण करणार्या गुर्हाळांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे आली होती. तसेच संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थांनीदेखील या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गुर्हाळ मालक, चालक यांना पूर्वी व आत्तादेखील नोटिसा पाठवून प्रदूषण करणार्या वस्तू जाळू नयेत, असे सूचित करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील दोन गुर्हाळ चालकांनी कचरा न जाळण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनकर्त्याकडून त्यांचे अभिनंदनदेखील करण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या बैठकीत गावातील सर्वच गुर्हाळ चालक, मालक यांनी एकमुखाने गुर्हाळांवर प्रदूषण होणार्या वस्तू न जाळण्याचा निर्णय घेऊन गावातील प्रदूषण कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. हे पाऊल गावाच्या, कामगारांच्या व स्वतःच्या हिताचे असून घेतलेल्या निर्णयाचे कायमस्वरूपी पालन व्हावे, हीच एक अपेक्षा नागरिक करीत आहेत.