पुणे : अडत्यांच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही; सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश | पुढारी

पुणे : अडत्यांच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही; सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीबाबत बदल अर्ज प्रलंबित असून, विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप घेतले असल्यामुळे सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या तात्पुरत्या स्वीकृती बदल करण्याच्या अर्जाला तात्पुरतीसुद्धा मंजुरी देणे योग्य नाही, असे मत नोंदवत सहायक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरत्या मंजुरीस नकार दिला.

26 डिसेंबर 2021 रोजी अडते असोसिएशनची निवडणूक पार पडली. अनिरुद्ध भोसले यांचे पॅनेल विजयी झाल्याचे प्रमाणपत्र अ‍ॅड. दौलत हिंगे यांनी दिले. त्या आधारे भोसले गटाने सहायक धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल सादर केला. त्यास विलास भुजबळ, सतीश उरसळ, बाळासाहेब उरसळ, काकासाहेब भालेराव, अनिल घुले, राजेंद्र कोरपे, युवराज काची, अमित उरसळ, दिलीप खिरीड, राहुल कोंढरे यांच्या गटाने अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करून हरकत घेतली होती.

निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची दखल घेऊन बदल अर्ज फेटाळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यादरम्यान, कामकाज करण्यासाठी तात्पुरती मंजुरी मिळावी, असा अर्ज भोसले यांच्या गटाने केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुणसे यांनी तात्पुरती मंजुरीसुध्दा नाकारण्याचा आदेश दिला. बदल अहवालाविरुद्ध बाजू मांडताना अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांना अ‍ॅड. अमित टकले व अ‍ॅड. शुभम नागणे यांनी साहाय्य केले.

विरोधी गटाचा या मुद्द्यांवर आक्षेप
निवडणुकीचा कालावधी 13 तासांचा असताना 12 तासांचेच चित्रीकरण उपलब्ध आहे. एकत्र चित्रीकरण अपेक्षित असताना तुकड्या- तुकड्यात चित्रीकरण देण्यात आले. दुपारी 3.30 वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक अधिकार्‍यांनी केली. प्रत्यक्षात मात्र 5.30 वाजता मोजणी सुरू केली. त्या दोन तासांत अनेक चुकीचे प्रकार घडल्याचा संशय विरोधी गटाला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीच्या प्रकारांना त्या वेळीच आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निकालानंतर मतदानप्रक्रियाच चुकीच्या पध्दतीने पार पडल्याची खात्री पटल्यानंतर आमच्या गटाने धर्मादाय आयुक्तांकडे कॅव्हेट दाखल केले. सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाबाबत समाधानी आहोत.

                              – अमोल घुले, अडतदार, विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार.

धर्मादाय आयुक्तांकडे तात्पुरता स्वीकृती बदल मागितला होता. त्यास धर्मादाय आयुक्तांनी नकार दिला आहे. परंतु, अध्यक्ष व सचिवांनी काम करू नये, असे कोठेही म्हटलेले नाही.
                                                         – अनिरुद्ध भोसले, निवडून आलेले अध्यक्ष.

 

Back to top button