पुणे : नवरात्रोत्सवात दांडियातून 35 कोटींची उलाढाल: इव्हेंट कंपन्यांकडून 200 कार्यक्रमांचे आयोजन | पुढारी

पुणे : नवरात्रोत्सवात दांडियातून 35 कोटींची उलाढाल: इव्हेंट कंपन्यांकडून 200 कार्यक्रमांचे आयोजन

सुवर्णा चव्हाण
पुणे : नवरात्रोत्सवात यंदा दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांचा धूमधडाका अनुभवायला मिळणार असून, या वर्षी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने इव्हेंट कंपन्यांकडून दांडिया-गरबाचे सुमारे 200 कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आले आहेत. यातून दहा दिवसांत सुमारे 30 ते 35 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दांडिया-गरबासाठी खास ऑर्केस्ट्रा विविध गाण्यांवर कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, सेलिब्रिटीही दांडिया- गरबाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.

कोथरूड, डेक्कन, वाघोली, एरंडवणे, कोरेगाव पार्क, कॅम्प अशा विविध ठिकाणी दांडिया-गरबाचे बहारदार कार्यक्रम होतील. असे कार्यक्रम आयोजित करणार्‍या इव्हेंट कंपन्यांचे काम नवरात्रोत्सवाच्या तीन महिने आधीच सुरू झाले होते आणि आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. इव्हेंट कंपन्यांची टीम कामाला लागली असून, वेगवेगळी लॉन्स, मैदान आणि सभागृहांमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला प्रायोजक मिळाले असून, दांडिया-गरब्याच्या ग्रुप्ससह सेलिबि—टींच्या उपस्थितीपर्यंतचे सर्व नियोजन इव्हेंट कंपन्यांनी केले आहे.

दै. ‘पुढारी’शी बोलताना इव्हेंट अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे (इमा) सदस्य निखिल कटारिया म्हणाले, ‘कोरोनामुळे दोन वर्षे दांडिया-गरबाचे कार्यक्रम झाले नाहीत. पण, यंदा इव्हेंट कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले आहेत. इव्हेंट कंपन्यांसह लाईटमन ते नृत्य कलाकारापर्यंत सर्वांना काम मिळाले आहे. मीसुद्धा दांडिया – गरबाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

आम्ही तीन महिन्यांपूर्वीच तयारीला सुरुवात केली. पोलिस परवानगी ते तिकीट विक्रीपर्यंत…ऑर्केस्ट्राच्या ग्रुपपासून ते लायटिंगपर्यंतचे काम टप्प्याटप्प्याने करीत आहोत. इव्हेंट कंपन्यांचे ग्रुप त्यांच्या-त्यांच्या पातळीवर असे कार्यक्रम आयोजित करतात. काहींचे 5 कार्यक्रम, तर काहींचे 9 कार्यक्रम नवरात्रोत्सवात आहेत. कलाकारांपासून ते इव्हेंट कंपनीच्या संचालकांपर्यंत एक साखळी आहे. प्रत्येक जण मिळून काम करीत आहे.’

एका इव्हेंट कंपनीचे अर्पण कासार म्हणाले, ‘आम्हीही दोन कार्यक्रम आयोजित केले आहेत. सध्या तिकीट विक्रीचे काम सुरू असून, दांडिया-गरब्याच्या कार्यक्रमात सेलिब्रिटींचाही सहभाग आहे. एका कार्यक्रमाला 3 ते 4 हजार लोक येतात. यंदा कार्यक्रमांना प्रायोजकही मिळाले आहेत. सोशल मीडियावरही प्रमोशन करीत आहोत.’

 

अडत्यांच्या कार्यकारिणीला मंजुरी नाही; सहायक धर्मादाय आयुक्तांचा
आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीबाबत बदल अर्ज प्रलंबित असून, विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप घेतले असल्यामुळे सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या तात्पुरत्या स्वीकृती बदल करण्याच्या अर्जाला तात्पुरतीसुद्धा मंजुरी देणे योग्य नाही, असे मत नोंदवत सहायक धर्मादाय आयुक्त रेश्मा पुणसे यांनी तात्पुरत्या मंजुरीस नकार दिला.
26 डिसेंबर 2021 रोजी अडते असोसिएशनची निवडणूक पार पडली. अनिरुद्ध भोसले यांचे पॅनेल विजयी झाल्याचे प्रमाणपत्र अ‍ॅड. दौलत हिंगे यांनी दिले. त्या आधारे भोसले गटाने सहायक धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवाल सादर केला. त्यास विलास भुजबळ, सतीश उरसळ, बाळासाहेब उरसळ, काकासाहेब भालेराव, अनिल घुले, राजेंद्र कोरपे, युवराज काची, अमित उरसळ, दिलीप खिरीड, राहुल कोंढरे यांच्या गटाने अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करून हरकत घेतली होती. निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराची दखल घेऊन बदल अर्ज फेटाळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यादरम्यान, कामकाज करण्यासाठी तात्पुरती मंजुरी मिळावी, असा अर्ज भोसले यांच्या गटाने केला होता. त्यावर सुनावणी होऊन पुणसे यांनी तात्पुरती मंजुरीसुध्दा नाकारण्याचा आदेश दिला. बदल अहवालाविरुद्ध बाजू मांडताना अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांना अ‍ॅड. अमित टकले व अ‍ॅड. शुभम नागणे यांनी साहाय्य केले.

विरोधी गटाचा या मुद्द्यांवर आक्षेप
निवडणुकीचा कालावधी 13 तासांचा असताना 12 तासांचेच चित्रीकरण उपलब्ध आहे. एकत्र चित्रीकरण अपेक्षित असताना तुकड्या- तुकड्यात चित्रीकरण देण्यात आले. दुपारी 3.30 वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक अधिकार्‍यांनी केली. प्रत्यक्षात मात्र 5.30 वाजता मोजणी सुरू केली. त्या दोन तासांत अनेक चुकीचे प्रकार घडल्याचा संशय विरोधी गटाला आहे.
————————————————-
निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीच्या प्रकारांना त्या वेळीच आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. निकालानंतर मतदानप्रक्रियाच चुकीच्या पध्दतीने पार पडल्याची खात्री पटल्यानंतर आमच्या गटाने धर्मादाय आयुक्तांकडे कॅव्हेट दाखल केले. सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाबाबत समाधानी आहोत.
– अमोल घुले, अडतदार, विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार.
————————————————-
धर्मादाय आयुक्तांकडे तात्पुरता स्वीकृती बदल मागितला होता. त्यास धर्मादाय आयुक्तांनी नकार दिला आहे. परंतु, अध्यक्ष व सचिवांनी काम करू नये, असे कोठेही म्हटलेले नाही.
– अनिरुद्ध भोसले, निवडून आलेले अध्यक्ष.

Back to top button