कचरा गोळा करणार्‍या संस्थांची मनमानी; धायरी, सिंहगड रोड परिसरात दुर्गंधी

धायरी येथील रस्त्यावर पडलेले कचर्‍याचे ढीग.
धायरी येथील रस्त्यावर पडलेले कचर्‍याचे ढीग.
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: धायरी विभागाचे आरोग्य निरीक्षक अजय जगधने म्हणाले, 'रस्त्यावर कचरा फेकणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. धायरी येथे कचरा टाकणार्‍यांच्या 12 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.' धायरी, नर्‍हे, नांदेड, सिंहगड रोड परिसराला सध्या कचर्‍याच्या ढीगांचा विळखा पडला आहे. तर दुसरीकडे कचरा गोळा करणार्‍या खासगी संस्थांच्या मनमानीपणामुळे नागरिकांसह प्रशासनही त्रस्त झाले आहे. कचर्‍याच्या वाढत्या समस्येने परिसरात दुर्गंधी पसरली आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कचर्‍याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आता खासगी संस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय विभागाची याबाबत बैठक झाली. महापालिका साफसफाईचा कर घेत असतानाही नागरिकांकडून खासगी संस्था कचरा उचलण्यासाठी मनमानीपणे पैसे घेत आहे, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कचर्‍याची समस्या गंभीर झाल्याचा आरोप या परिसरातील
नागरिकांनी केला आहे.

लोकवस्त्या, सोसायट्या व इतर ठिकाणी खासगी संस्थेकडून ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. त्यासाठी दरमहा एका कुटुंबाकडून पन्नास ते दोनशे रुपये घेतले जात आहेत. दुकानदार, व्यावसायिकांकडून मनमानीपणे पैसे घेतले जात आहेत. धायरी परिसरात ग्रामपंचायत काळापासून पैसे घेतले जात आहेत.

आता सिंहगड रोड, वडगाव परिसरातही असे पैसे घेतले जात आहेत. लोकवस्त्या, झोपडपट्ट्या, तसेच भाडेकरू व परप्रांतीय मजुरांना पैसे देणे परवडत नसल्याने ते कचरा थेट गल्लीबोळात, रस्त्यांवर किंवा मुठा कालव्यात फेकत आहेत. दुकानदार, हॉटेल व्यावसायिक सडलेले मांस, खाद्यपदार्थ, बाटल्या प्लास्टिकचा कचरा फेकून गायब होत आहेत. मुख्य सिंहगड  रोड, नांदेड सिटी गेट, धायरी उड्डाणपूल आदी ठिकाणी पडलेल्या कचर्‍याचा ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.

कचर्‍याची जबाबदारी कोणाची ?
नांदेड सिटी गेट परिसरात व्यावसायिकांचे भंगार, सडलेला कचरा अनेक महिन्यांपासून टाकला जात आहे. ये-जा करणारे नागरिकही कचरा टाकत आहेत. असे चित्र मुख्य सिंहगड रोड, नांदेड फाटा, किरकटवाडी फाट्यासह सर्वत्र दिसून येत आहे. कचरा व्यवस्थापन करण्याची नक्की जबाबदारी कुणाची आहे ? याकडे भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी लक्ष वेधले आहे

नियमित कचरा गोळा करण्यासाठी पालिकेची वाहने, सफाई कर्मचारी आहेत. या शिवाय खासगी संस्थेच्या वतीने कचरा गोळा केला जात आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात रस्त्यावर तसेच आडबाजूला कचर्‍याचे ढीग साचत आहेत. खासगी संस्थांच्या कामात त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.
                                                                 प्रदीप आव्हाड,
                                           सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय विभाग

महापालिका कर घेत असतानाही कचरा गोळा करण्यासाठी खासगी संस्थेला पैसे द्यावे लागत आहेत. पैसे देणे परवडत नसल्याने अनेक जण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत, याबाबत प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा.
                                                     धनंजय बेनकर,                                                                                             माजी उपसरपंच, धायरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news