बावडा : भीमा नदीची पाण्याची पातळी पूर्वपदावर! | पुढारी

बावडा : भीमा नदीची पाण्याची पातळी पूर्वपदावर!

बावडा; पुढारी वृत्तसेवा: उजनी धरणामधून भीमा नदीत सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग 11 हजार 600 क्युसेक एवढा कमी करण्यात आला आहे. परिणामी इंदापूर तालुक्यातून वाहणार्‍या भीमा नदीची पाण्याची पातळी पूर्वपदावर आल्याचे चित्र गुरुवारी (दि. 22) पहावयास मिळाले. उजनी धरणातून तीन दिवसांपूर्वी नदीपात्रात 1 लाख 1 हजार 600 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नदीवरील बंधारे तसेच गणेशवाडी येथील पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण तीन दिवस ठप्प झाले होते.

मात्र, पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने हळूहळू उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून तो 11 हजार 600 क्युसेक एवढा ठेवण्यात आल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला असल्याची माहिती निरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे (सुरवड) यांनी दिली. दरम्यान, उजनी धरणामध्ये गुरुवारी 119.14 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, धरण 103.56 टक्के क्षमतेने भरलेले आहे. उजनी धरणामध्ये दौंड येथून येणार्‍या पाण्याचा विसर्ग कमी होऊन सध्या 16 हजार 758 क्युसेक एवढा आहे.

Back to top button