तब्बल 36 लाख पळविणारे जेरबंद; वालचंदनगर पोलिसांची तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई | पुढारी

तब्बल 36 लाख पळविणारे जेरबंद; वालचंदनगर पोलिसांची तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई

जंक्शन; पुढारी वृत्तसेवा: कळस- जंक्शन रस्त्यावर चारचाकी गाडीला ओव्हरटेक करून गाडी थांबविण्यास भाग पाडून लोखंडी रॉडने चारचाकी गाडीच्या काचा फोडून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. 17) घडली होती. या घटनेतील तीन चोरट्यांच्या टोळीला वालचंदनगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून अटक केली. अमोल विलास होले (रा. पारवडी, ता. बारामती), सचिन राजाराम नाळे (रा. थेरवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व जयेश्वर जगन्नाथ मोरे (रा. पोहरेगाव, ता. रेणापूर, जि. सोलापर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस-जंक्शन रस्त्यावर शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास लोणीदेवकर एमआयडीसीतील वायएक्सीस स्ट्रक्चरल स्टीलस प्रायव्हेड लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी गणेश लक्ष्मण शेलार (रा. पळसदेव-माळवाडी, ता. इंदापूर) व बबन चंदर कोरडे (रा. लोणी देवकर) हे दोघे जण बारामती व जंक्शन येथील स्टील दुकानातून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची रोख रक्कम गोळा करून लोणी देवकर कंपनीमध्ये चालले होते.

या वेळी वरील तिघेजण कंपनीच्या गाडीचा पाठलाग करीत होते. कळस गावच्या परिसरामध्ये माळरानावर त्यांनी ही गाडी थांबविण्यास भाग पाडले होते. गाडी थांबताच लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडून दरवाजा उघडून 36 लाख 31 हजार 900 रुपयांची असलेली बॅग घेऊन त्यांनी पोबारा केला होता. या घटनेतील वरील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखील पोलिस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, अतुल खंदारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, जी. बी. जगदाळे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम यांनी तपास करून आरोपींना जेरबंद केले.

Back to top button