मंचर : कांद्याचे बाजारभाव पुन्हा पडले! शेतकरीवर्ग आर्थिक संकटात | पुढारी

मंचर : कांद्याचे बाजारभाव पुन्हा पडले! शेतकरीवर्ग आर्थिक संकटात

मंचर; पुढारी वृत्तसेवा: कांद्याचे बाजारभाव सध्या मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात आला आहे. कांद्याने पुन्हा एकदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शासनाने निर्णायक भूमिका घेऊन कांदा उत्पादकांना प्रतिकिलो चार ते पाच रुपये अनुदान द्यावे, अशी शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे. कमी बाजारभावात शेतकर्‍यांना सध्या कांद्याची विक्री करावी लागत असून भांडवली खर्च, आजपर्यंत साठवलेला कांदा, विक्रीचा भाव याचा मेळ घालताना कांद्यापासून शेतकर्‍यांच्या हाती काही येत नसून शासनाने यात तोडगा काढून कांद्याचे बाजारभाव वाढवणे आता गरजेचे झाले आहे.

सध्या शेतकरी कांदा भरणी करत असून मागील चार ते पाच महिन्यापासून साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी आता कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवू लागले आहेत. परंतु या कांद्याला चांगला व योग्य प्रकारचा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांना कांदा रडवू लागला असून यामध्ये शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.

या परिसरातील शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न हे कांद्याचे पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. परंतु कांद्याचे बाजारभाव पडल्याने शेतकर्‍यांनाही सध्या काहीच हाती लागत नसून पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने यात योग्य तो मार्ग काढून कांद्याचे बाजारभाव कमीत कमी 20 रुपये किलो याप्रमाणे करण्याची मागणी होत आहे.

Back to top button