
कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, असे ठरत आहे. गतिरोधकावरून जाताना वाहनचालक वाहनाचा वेग अजिबात कमी करीत नाही. उलट वेग कमी करून जाणार्या वाहनांचे अपघात होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुक्यातून मनमाड बेळगाव राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मार्गावर विविध प्रकाराच्या वाहनांची सतत रहदारी असते. नवीन काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार झाला, मात्र बेशिस्त वाहनचालकांची संख्याही वाढली.
रस्त्यालगत शाळा, वाड्यावस्त्या, मंदिर, सोसायटी, दवाखाने, पेट्रोल पंप, उताराचा रस्ता, लहान व मोठे चौक आदी ठिकाणी महामार्गावर जागोजागी गतिरोधक तयार केले आहेत. गतिरोधक पाहून वाहनाचा वेग कमी करणे अपेक्षित असते. त्यामुळे अपघात टाळता येतात. मात्र, येथील गतिरोधकाची रचना पाहता तसे होत नाही. बेशिस्त वाहनचालक जड व मोठी वाहने सुसाट वेगाने घेऊन निघून जातात.
त्यांना या गतिरोधकाचा कुठला परिणाम जाणवत नाही, परंतु लहान वाहनचालकाची धडपड होते. दुचाकीसह लहान वाहनांना येथे वेग कमी करावा लागतो. मात्र वेग कमी केल्यास पाठीमागून सुसाट वेगात जाणार्या मोठ्या वाहनांची धडक बसल्याच्या घटना वाढत आहेत. मोठ्या वाहनांसाठी हे गतिरोधक असून नसल्यासारखे झाले आहे. रस्ते विकास महामंडळाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.