नानगाव : हिरवळीच्या खतांकडे कल | पुढारी

नानगाव : हिरवळीच्या खतांकडे कल

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीपट्ट्यातील काही भागांतील बागायती जमिनी अतिपाण्यामुळे खराब होत आहेत, तर सततच्या एक पीक पद्धतीमुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात हिरवळीची खते मिळण्यासाठी ढेंच्या, ताग अशा वनस्पती लावून जमिनीकडे लक्ष देत आहेत.

या भागात भीमा नदीमुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी भरमसाठ पाण्याचा वापर करत आहेत. भरमसाठ पाण्याच्या वापरामुळे या भागातील जमिनीचा कस कमी होते आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रासायनिक फवारण्या आणि वाढता खतांचा वापर यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होत आहे.

शेतीमध्ये प्रामुख्याने नत्र, स्फुरद व पालाश यांची गरज असते. हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर नत्र असते. नत्रामध्ये प्रोटीन असते. हवेतील हेच नत्र हिरवळीच्या खतांसाठी लावलेल्या वनस्पती हवेतून घेतात व तो नत्र मुळांच्या गाठीत साठवून ठेवतात. वनस्पती फुलोर्‍यात आल्यावर शेतकरी नांगरणी करून ढेंच्या, ताग यांसारख्या वनस्पती जमिनीत गाडल्या जातात व त्यामुळे हे हवेतील नत्र जमिनीला मिळते. याचा शेतातील पिके व जमिनीला चांगला उपयोग होतो.

सध्या या भागातील बरेचसे शेतकरी शेतामध्ये अशा प्रकारे ढेंच्या, ताग इत्यादी हिरवळीची खते तयार करणार्‍या वनस्पती शेतामध्ये लावून वेगवेगळ्या प्रकारे शेतात नत्र पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. तसेच बरेचसे तरुण शेतकरीवर्ग हळूहळू सेंद्रिय शेतीची वाट धरताना दिसत आहे.

Back to top button