पुणे : लाखनगावात बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्‍यात ६ शेळ्या ठार - पुढारी

पुणे : लाखनगावात बिबट्याचा धुमाकूळ; हल्‍ल्‍यात ६ शेळ्या ठार

लोणी – धामणी (पुणे) : पुढारी वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लाखनगावात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. लाखणगाव गावातील केदरकडा- पोंदेवस्ती येथे कुंपण भिंतीच्या तारेवरून उडी मारून गोठ्यात घुसून सहा शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. यामध्ये दोन शेळ्या जखमी झाल्‍या. ही घटना आज (रविवार) पहाटे घडली. यामध्ये अलमगिरी मुजावर या शेतकऱ्याचे अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लाखनगावात बिबट्याचा धुमाकूळ थांबत नसल्‍याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाखण गावातील केदरकडा पोंदेवस्ती येथे अलमगिर मुजावर हे शेतकरी राहतात. त्यांच्याकडे १२० शेळ्यांचा गोठा आहे. घराशेजारी असलेल्या गोठ्यात शेळ्या असतात. शनिवारी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेळ्यांना चारा टाकला होता.

पहाटे बिबट्याने गोठयाच्या तारांच्या कपांऊडवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला. यावेळी बिबट्याने हल्‍ला करत सहा शेळ्या ठार केल्या व दोन शेळ्या जखमी केल्या. सकाळी मुजावर हे शेळ्यांच्या गोठ्यात गेले असता, घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच वनविभागाला घटनेची खबर दिली. वनरक्षक सोपान अनासूने, वनपाल सोनल भालेराव यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच प्राजक्ता रोडे शिरीष रोडे, माजी सरपंच दस्तगीर मुजावर व ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहेत. यापूर्वी येथे बिबट्याने शेळ्या, मेंढ्या मारल्या आहेत. या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास वन विभागाला अपयश आल्‍याचा आरोप शेतकरी, नागरिकांनी केला आहे.

त्वरीत नुकसान भरपाई दिली जाईल, आजच्या आजच पिंजरा लावला जाईल,  असे वनरक्षक सोपान अनासूने यांनी  सांगितले.

हेही वाचलं का ? 

Back to top button