
पुणे : पुढारी वृत्तसेवा : रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेवर प्राणी व भटक्या कुत्र्यांसाठी हॉस्पिटल्स सुरू करण्यास शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी विरोध दर्शविला आहे. हडपसर भागात अनेक त्रासदायक प्रकल्प आधीच असून, आता प्राण्यांच्या हॉस्पिटलमुळे समस्या वाढणार आहेत. याऐवजी सामान्य व्यक्तींसाठी मनपाच्या वतीने हॉस्पिटल उभारावे," अशी मागणीही भानगिरे यांनी केली आहे. 'मिशन पॉसिबल" या संस्थेस 33 वर्षांच्या कराराने रामटेकडी येथील जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत आयुक्तांनी मंजूर केला.
यासंदर्भात शहराध्यक्ष शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे संकेत आहेत. अधिकाराचा दुरुपयोग करून प्रशासन हडपसरमध्ये हा प्रकल्प लादत आहे. स्थायी समितीने मान्य केलेल्या प्रस्तावाचा प्रशासनाने फेरविचार करावा, हा प्रकल्प हडपसर मतदारसंघावर लादल्यास तीव— आंदोलन केले जाईल, असा इशाराही भानगिरे यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.