पुणे : हवे 20.34 टीएमसी पाणी! महापालिकेकडून ‘जलसंपदा’ला वॉटर बजेट सादर | पुढारी

पुणे : हवे 20.34 टीएमसी पाणी! महापालिकेकडून ‘जलसंपदा’ला वॉटर बजेट सादर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने जलसंपदा विभागाला शहराच्या पाण्याचे अंदाजपत्रक (वॉटर बजेट) सादर केले आहे. यामध्ये शहराला 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेली गावे आणि वाढती लोकसंख्या, यामुळे गेल्या 10 वर्षांत शहराची तहान 6 टीएमसीने वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास असून, या लोकसंख्येला खडकवासल्यासह चार धरणांमधून पूर्वीपासून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून भामा आसखेड धरणातील 2.65 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. महापालिकेने जलसंपदा विभागासोबत 2001 मध्ये 11.50 टीएमसी पाण्याचा करार केला आहे. शहराच्या लोकसंख्येत वरचेवर वाढ झाली. मात्र, पाणीसाठ्याच्या कराराचे गेल्या 20 वर्षांत नूतनीकरण झालेले नाही.

महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार महापालिकेने 2021-22 या वर्षाचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हे अंदाजपत्रक 2019 मध्ये पालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे तयार केले आहे. त्यासाठी शहराची लोकसंख्या 52 लाख 08 हजार 444 इतकी निश्चित केली आहे. त्यानंतर 2 वर्षांची वाढ गृहीत धरून 54 लाख 18 हजार 864 इतकी लोकसंख्या निश्चित केली आहे.

यामध्ये नव्याने समावेश झालेल्या 34 गावांची लोकसंख्या मिळविल्यास शहराची लोकसंख्या 69 लाख 41 हजार 460 इतकी होते. ही लोकसंख्या आधार धरून सन 2021-2022 चे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार शहराला 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. या वाढीव पाणीकोट्याबाबत जलसंपदा विभाग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाणीगळती 20 टक्क्यांवर येणार
मागील अनेक वर्षांपासून महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून 35 टक्के पाणीगळती सुरू आहे. ही गळती कमी करण्यासाठी महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत शहरातील जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिन्या बदलल्यानंतर पाणीगळती 35 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर येणार असल्याचा दावा महापालिका करीत आहे.

  • 2001 मध्ये झालेल्या पाणी करारात 11.50 टीएमसी पाणी कोटा निश्चित
  • प्रत्यक्ष घेतले जात असलेले पाणी – 14.61 टीएमसी
  • पाणी करारासाठी निश्चित केलेली लोकसंख्या – 52 लाख 08 हजार 444
  • 2021-22 सालासाठी वॉटर बजेटमध्ये मागणी केलेला पाणी कोटा 20.34 टीएमसी
  • समाविष्ट गावांमधील लोकसंख्येसह शहराची लोकसंख्या – 69 लाख 41 हजार 460
  • शहराची वाढती हद्द आणि लोकसंख्येमुळे हवा वाढीव पाण्याचा कोटा

Back to top button