चांदणी चौकात पुन्हा वाहतूक कोंडी; पावसामुळे पूल पाडण्याच्या कामात व्यत्यय | पुढारी

चांदणी चौकात पुन्हा वाहतूक कोंडी; पावसामुळे पूल पाडण्याच्या कामात व्यत्यय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील पूल पाडण्यास विलंब होत असून, परिसरात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे देहूरोड- कात्रज मार्गावरील वाहतूक संथ गतीने होत आहे. पूल पाडण्याच्या पूर्वतयारीत संततधार पावसामुळे व्यत्यय येतो आहे, त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी  लांबली आहे. महामार्गांवरील वाहनांमध्ये कारची संख्या अधिक असल्याने त्यांची रांग लांबपर्यंत लागते. ही रांग तीन-चार किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महामार्गावर शनिवारी सायंकाळी वाहनांची गर्दी झाली. मुळशीकडून नवीन पुलावरून येणारी वाहने कोथरूडकडे जाण्यासाठी महामार्गावर येतात, तेथे कोंडी होत आहे. त्यातच प्रकल्पाची कामे सुरू असल्याने कोथरूड, वारजे भागातील वाहनांसाठी अरुंद रस्ते शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे उपनगरातील रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. महापालिकेने पुलावरील साडेचारशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी स्थलांतरीत केली आहे. त्यासाठी महामार्गावर लोखंडी स्ट्रक्चर उभारले.

त्यावरून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. ती जलवाहिनी जोडण्याचे काम शनिवारी सुरू होते. दिल्लीतील नोएडा येथील ट्वीन टॉवर पाडणार्‍या कंपनीकडे चांदणी चौकातील पूल पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या कंपनीने पुलावरील जादा भराव काढून टाकला असून तेथे आता स्फोटके भरण्यासाठी ड्रिलिंगचे काम हाती घेतले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे जात असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकला. त्यावेळी वाहनचालकांनी येथे रोजच कोंडी होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली होती. शिंदे यांनी तक्रारीची दखल घेत पुन्हा चौकाची पाहणी केली. पूल लवकर पाडण्याचे नियोजनही आखण्यात आले. त्या कामाला मुहूर्त टळला असला, तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली.

Back to top button