
राजेंद्र खोमणे
नानगाव : गुर्हाळांवर जाळण्यात येणार्या व प्रदूषण वाढविणार्या वस्तूंमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरल्याने नागरिक त्रस्त होतात. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही मतांच्या लाचारीपोटी या तक्रारीवर ग्रामपंचायत कसलीही ठोस कारवाई करत नसल्याने ही गुर्हाळे पुन्हा एकदा जोमाने प्रदूषण करण्यासाठी तयार असतात. तक्रारीवर ग्रामपंचायत प्रशासनाची हाताची घडी आणि तोंडावर बोट, हीच परिस्थिती पाहावयास मिळते.
गावात जर गुर्हाळ व्यवसाय करावयाचा असेल, तर ग्रामपंचायतीकडून ना-हरकत दाखला दिला जातो. अनेक विभागांच्या परवानग्या घेऊन गुर्हाळ व्यवसाय सुरू केले जातात. वेगवेगळे निकष, नियम आणि अटींचे पालन करून व्यवसाय सुरू होतात. मात्र, एकदा व्यवसाय सुरू झाला की सगळे नियम आणि अटींना केरांची टोपली दाखवत गुर्हाळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करीत थाटात उभी आहेत.
ग्रामपंचायतीने गुर्हाळाला ना-हरकत दाखला दिला असल्याने गुर्हाळापासून जर काही हानी होत असेल, तर त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष असणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा धुरामुळे त्रस्त झालेले नागरिक ग्रामपंचायतीकडे तक्रार करतात. यावर ग्रामपंचायत प्रशासन अशा व्यवसाय करणार्या गुर्हाळ चालक व मालकांना फक्त नोटीस बजावून मोकळी होते. या नोटिशीला केराची टोपली दाखवून गुर्हाळ चालक व मालक पुन्हा जोरात गुर्हाळ चालवत असतात. ग्रामपंचायतीत साहजिकच राजकारण्यांचा भरणा असल्याने, तसेच गुर्हाळ चालविणारे गावातील मोठे व धनदांडगे लोक असतात. 8(पान 3 वर)
जर माणसेच राहिली नाहीत तर…
गुर्हाळांच्या वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आजार वाढत चालले असून, आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्याचे वाढते आजार आणि कमी होणारे आयुष्यमान यामुळे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आजारांमुळे माणसांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. जर माणसेच राहिली नाही, तर मतांच्या बेरजेचे राजकारण करून उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
..तर ग्रा.पं.वर मनुष्यवधाचा गुन्हा
गावातील चार लोकांच्या मतासाठी जर ग्रामपंचायत प्रशासन कडक कारवाई करीत नसेल, तर ग्रामपंचायतीकडून नागरिकांना पुरविल्या जाणार्या सेवासुविधा कुचकामी ठरत आहेत. अशा प्रदूषित धुरामुळे जर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असेल व कोणाचा या कारणामुळे मृत्यू होत असेल, तर याला सर्वप्रथम ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.