
पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून विविध ठिकाणी व्यवस्था केलेल्या लोखंडी टाक्या रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवरच पडून आहेत. त्यामुळे रस्त्यावरील मंडप तातडीने काढा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देणार्या महापालिकेचेही पाऊल गणेश मंडळांच्याच पावलावर असल्याचे समोर आले आहे.
गणेशोत्सवासाठी महापालिकेने या वर्षी तब्बल 2353 गणेश मंडळांना परवानगी दिली होती. त्यात 1826 मंडळे ही 2019 च्या परवाना घेतलेली आहेत, तर यंदा 527 मंडळे नव्याने वाढली आहेत. त्यांचे मांडव तसेच रनिंग मंडपांना महापालिकेने 31 सप्टेंबर 2022 ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत परवाना दिलेला आहे. परवाने देताना गणेशोत्सव संपल्यानंतर 48 तासांत मंडळांनी मंडप, रनिंग मंडप, तसेच देखाव्यांचे साहित्य काढून घेण्याचे बंधन घातले होते.
मात्र, अनेक मंडळांचे मंडप, डेकोरेशन साहित्य, जाहिरात कमानी रस्त्यावर तशाच आहेत. अनेक ठिकाणी काढलेले साहित्य रस्त्यावर व पदपथांवर पडून आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंडळांनी व मंडप व्यावसायिकांनी तातडीने आपले साहित्य काढून घ्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच गणेश मंडळांनी मंडप, साहित्य, काढले आहे किंवा नाही, खड्डे दुरुस्त केले आहेत की नाही याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा देणार्या महापालिकेची भूमिका दुसर्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने गणेश विसर्जनासाठी 303 ठिकाणी व्यवस्था केली होती. त्यामध्ये 46 बांधीव हौद, 360 लोखंडी टाक्या, 216 मूर्ती संकलन केंद्र आणि 150 फिरते विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती. फिरत्या हौदांसाठी निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोखंडी हौद महापालिकेच्या मालकीचे होते. अनेक ठिकाणी हे लोखंडी हौद जागेवरच रस्त्यावर आणि पदपथांवर पडून आहेत, बांधलेले पडदे वार्यावर डुलत आहेत. या टाक्यांनी पदपथ व्यापल्याने पादचार्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.