पुणेः भोसलेसह साथीदारावर मोक्का | पुढारी

पुणेः भोसलेसह साथीदारावर मोक्का

पुणे; पुढारी वृत्तसेवा: संघटीत गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार जितेंद्र अशोक भोसले (वय 38, रा. विमाननगर) व त्याचा साथीदार सतीश एकनाथ कोल्हे (वय 38, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) या दोघांवर पोलिस आयुक्त अमिता गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. गुप्ता यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली मोक्काची ही 95 वी  कारवाई आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जितेंद्र भोसले हा टोळीप्रमुख असून, साथीदार सतीश कोल्हे याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्हा हा दोघांनी परिसरात आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले.

दोघा आरोपींनी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या खंडणी मागणे, खंडणी गोळा करणे, बेकायदा जमाव एकत्र करून मारहाण व दुखापत करणे, मालमत्तांचे नुकसान करून जिवे ठार करण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

मात्र, त्यांनी आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. चव्हाण यांनी प्रस्तावाला मान्यता देऊन कारवाईचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.

Back to top button