उंडवडी सुपे परिसरात लम्पीची लागण; पशुसंवर्धन आयुक्त पोहोचले ग्रामीण भागात | पुढारी

उंडवडी सुपे परिसरात लम्पीची लागण; पशुसंवर्धन आयुक्त पोहोचले ग्रामीण भागात

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील पशुसंवर्धन दवाखान्यात कार्यक्षेत्रातील दोन गावांत लम्पी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये उंडवडी सुपे येथील एका शेतकर्‍याची गाय व उंडवडी कडेपठार येथील एक गाभण कालवडीला प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने परिसरातील गावात लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण हाती घेतले आहे. आत्तापर्यंत तीन गावांतील शेतकर्‍यांच्या 3100 जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी उंडवडी कडेपठार हद्दीतील बोपळबेट येथील एका शेतकर्‍याच्या दोन वर्षे वयाच्या गाभण कालवडीला लम्पी स्किन या आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यानुसार उंडवडी सुपे येथील पशुधन अधिकारी डॉ. पी. बी. होळकर यांनी रक्ताचे नमुने तपासणीला दिले होते. याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संबंधित आजाराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने उंडवडी क.प., सोनवडी सुपे व जराडवाडी या गावात जनावरांना लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान लसीकरण मोहिमेसाठी तीन टीम करण्यात आल्या आहेत. संबंधित गावात शेतकर्‍याच्या घरी जाऊन लस देण्याचे काम वेगात सुरू असून यामध्ये उंडवडी सुपे पशुसंवर्धन दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक पी. बी होळकर, परिचर महेश गायकवाड, पशुधन विकास अधिकारी दीपक पवार, परिचर बाळासाहेब चव्हाण, डी. आर. पोळ, अनिल शिंदे या मोहिमेत सहभागी आहेत. लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 3100 जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

पशुसंवर्धन आयुक्तांची भेट
उंडवडी सुपे येथे लम्पी स्किन आजाराची लक्षणे आढळून आलेल्या गाईची राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी पशुधन अधिकार्‍यांकडून लम्पी स्किन आजार व लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली. उपचार व लसीकरणाबाबत त्यांनी सूचना दिल्या, तसेच या आजाराबाबत शेतकर्‍यांशी सविस्तर चर्चा केली.

येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल व खराडेवाडी ही सहा गावे असून 6 हजार 500 एवढे पशुधन आहे. यातील 3 हजार 400 जनावरांचे लसीकरण राहिलेले असून लस उपलब्ध होईल, त्यानुसार उर्वरित गावातही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यांनी सांगितली.डॉ. पी. बी. होळकर, पशुधन पर्यवेक्षक, उंडवडी सुपे

Back to top button