
उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा: पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डीदरम्यानच्या रस्त्यावरील सुरक्षितता व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या भागातील अतिक्रमणे शुक्रवार(दि. 16)पासून हटविण्यात येणार आहेत. कामासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालय, सीजीएम (टेक) आणि आरओ मुंबई, हवेली व दौंड तहसीलदार कार्यालय, लोणी काळभोर पोलिस ठाणे यांची मदत मागवली आहे.
पुणे -सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. सेवा रस्त्यापर्यंत व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. परिणामी हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान अतिक्रमणे काढण्यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण(एनएचआय)ने सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिलेल्या 20 मी. ते 40 मी. किमीच्या विभागात सध्याचे चार लेनिंग विकसित केले आहे. या विभागात सर्वत्र अनधिकृत अतिक्रमणे उभी असल्याचे निदर्शनास आले आहे.
या आस्थापनांनी बिल्डिंग लाइन (37 मी) आणि नियंत्रण रेषा (50 मी) यासह कोणत्याही बांधकाम उपनियमांचे पालन केलेले नाही. या आस्थापनांमुळे पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात, विशेषतः उरुळी कांचन गावात अडथळा निर्माण झाला आहे. आस्थापना बिल्डिंग लाइनच्या पलीकडे स्थलांतरित करणे आवश्यक आहे.
पोलिस संरक्षण देण्याची मागणी
अनधिकृत अतिक्रमणांनी नैसर्गिक नाला अडवल्यानेच परिसरात पाणी साचून राहते. परिणामी महामार्गावर अपघातांची शक्यता वाढली आहे. वरील बाबी लक्षात घेता, अतिक्रमण हटवण्यासाठी शुक्रवारी (दि. 16) पोलिस संरक्षण देण्याची विनंती करण्यात आले.