पुणे : विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावरच! पीएमपी स्कूल बसमध्ये महिला सहायकच नाही | पुढारी

पुणे : विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावरच! पीएमपी स्कूल बसमध्ये महिला सहायकच नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपी अधिकार्‍यांनी सोमवारी शालेय वाहतुकीसाठी असलेल्या बसगाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी या बसमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक असलेली महिला सहायक नसल्याचे समोर आले. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने शालेय गाड्यांमध्ये तत्काळ महिला सहायक नेमावे, अन्यथा शालेय वाहतूक सेवा बंद करण्यात येईल, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.

पीएमपीच्या 55 गाड्यांमार्फत 33 शाळांना शालेय वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येते. या गाड्यांमार्फत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होऊन, मुलांच्या जिवाशी खेळ सुरू होता. यासंदर्भात दै.‘पुढारी’ने अनेकदा वृत्त प्रसिध्द केली आहेत. त्याची दखल घेऊन पीएमपीचे जनरल मॅनेजर सुबोध मेडशीकर यांनी स्वत: शालेय वाहतुकीच्या गाड्यांची सोमवारी (दि.12) पाहणी केली.

या वेळी त्यांना बसमध्ये महिला सहायक नसल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि बसमध्ये महिला सहायक नेमणे शाळेला बंधनकारक असल्याचे सांगितले. महिला सहायक न नेमल्यास आम्ही शाळेची बससेवा बंद करू, असेही सांगितले.

तसेच सोमवारीच प्रशासनाने सर्व शाळांना यासंदर्भातील पत्र पाठविली. तसेच, यापुढे प्रत्येक शालेय बसची पाहणी पीएमपी अधिकारी करणार आहेत. बसमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही चुकीचे आढळल्यास पीएमपी प्रशासन संबंधित शाळेची शालेय सेवा बंद करणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

मंगळवार पेठेतील एका शाळेत सेवा पुरवत असलेल्या पीएमपीच्या बसची सोमवारी सकाळी पाहणी केली. या वेळी पीएमपीच्या बसमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान बसमध्ये महिला सहायक नसल्याचे समोर आले. त्या संबंधित शाळेला सूचना दिल्या असून, इतर सर्व शाळांनादेखील तत्काळ पत्र पाठविण्यात आले आहे. शाळेच्या बसमध्ये महिला सहायक नसल्यास संबंधित शाळेची बससेवा बंद करण्यात येणार आहे.
 – सुबोध मेडशीकर                                                                                              महाव्यवस्थापक, पीएमपी

शालेय वाहतूक समितीचा पत्ता नाही
मोटार वाहन कायद्यानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी शालेय वाहतूक समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. सोमवारच्या पाहणीत काही शाळांनी शालेय वाहतूक समिती नेमली नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे पीएमपी अधिकार्‍यांनी पत्र पाठवून शाळांना समिती नेमण्याची सूचना दिली आहे.

 

Back to top button