बटाटा पिकात पावसाचे पाणी साठले; पेठ परिसरातील मुसळधार पावसाचा परिणाम | पुढारी

बटाटा पिकात पावसाचे पाणी साठले; पेठ परिसरातील मुसळधार पावसाचा परिणाम

पेठ : आंबेगाव भागात रविवारी (दि. 11) दुपारी साडेतीन वाजता पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शेतातील बटाटा पिकात पाणी साठल्याने बटाटा पीक धोक्यात आल्याची माहिती आंबेगावचे शिवसेना तालुकाध्यक्ष दिलीपराव पवळे यांनी सांगितले.
पेठ परिसरात पाऊण तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी वाहू लागले. येथील मुख्य बटाटा पीक असून, येत्या 4 ते 5 दिवसांत अगोदर लावलेला बटाटा काढणीस आला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे.

शेतकर्‍यांनी एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च करून बटाटा पीक घेतले आहे. त्यात वारंवार पाऊस पडत असल्याने परिपूर्ण वाढ झालेल्या बटाटा पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. दुपारी साडेतीन वाजता जोरदार पाऊस झाला. शेतात गेलेल्या शेतकर्‍यांची अचानक मोठा पाऊस झाल्याने धांदल उडाली. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने शेतकर्‍यांची खुरपणी व इतर कामे अर्धवट राहिल्याने धावपळ उडाली. पाऊण तास मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

सर्व शेतकरी आपल्या शेतातील बटाटा पिकात साचलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. शेतात साठलेले पाणी जर बाहेर काढून दिले नाही, तर बटाटा पीक मातीत सडून जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. काढणीला आलेल्या शेतकर्‍यांच्या बटाटा पिकाचे पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना अतिवृष्टीबाबतची नुकसानभरपाई देण्याबाबतच्या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. 12) घोडेगाव येथे तहसीलदारांना देण्यात येणार असल्याचे दिलीपराव पवळे यांनी सांगितले.

Back to top button