वारजे : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! सर्पदंश झालेल्या मुलाला वाचवले | पुढारी

वारजे : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! सर्पदंश झालेल्या मुलाला वाचवले

वारजे; पुढारी वृत्तसेवा: डेक्कन परिसरात विविध मंडळांची शुक्रवारी गणेश विसर्जनाची लगभग सुरू होती. यामुळे या भागातील रस्त्यांवर गर्दी झाली होती. या गर्दीतून वाट काढत सर्पदंश झालेल्या तेरा वर्षीय बालकाला पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या कामगिरीबद्दल पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात ही घटना घडली. वारजेतील गोकुळनगर परिसरात वसंत साठे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरासमोर मोकळे पटांगण आहे.

शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास या पटांगणावर असलेल्या गवतामधून जात असताना त्यांचा 13 वर्षीय मुलगा आर्यन याच्या पायाला सापाने चावा घेतला.हेे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी त्याला दुचाकीवर बसवून खंडोजी बाबा चौकापर्यंत आणले. मात्र त्यांना गर्दीतून पुढे जाता येईना. त्यामुळे तिथे बंदोबस्तासाठी असणारे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे, पोलिस कर्मचारी संदीप सांगळे यांना वसंत साठे यांनी मदतीसाठी विनंती केली.

सर्पदंश झालेला आर्यन बेशुद्ध अवस्थेत चालल्याचे लक्षात आल्याने बोत्रे यांनी सांगळे यांना आर्यनला तत्काळ पोलिस वाहनातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. सांगळे यांनी गर्दीतून सायरन वाजवत वाहतूक बंद असलेल्या रस्त्यावरील बॅरिकेड्स काढत पोलिस वाहनातून आर्यनला तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डेक्कन खंडोजी बाबा चौक येथे बंदोबस्तास असताना वसंत साठे यांनी मुलाला सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी मला पोलिस वाहनातून या मुलाला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर गाडीचा सायरन लावून व ठिकठिकाणी असणारे बॅरिकेड्स काढून रस्ता मोकळा करण्यात आल्याने या मुलाला तातडीने रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले.
 

                                              – संदीप सांगळे, पोलिस कर्मचारी, उत्तमनगर

 

Back to top button