
बारामती; पुढारी वृत्तसेवा: शहरातील दुर्गा टॉकीज ही वास्तू लवकरच जमीनदोस्त होणार आहे. या जागेवर नवीन मॉल बांधण्यात येणार असल्याने पूर्वीची दुर्गा टॉकीज व सध्याची दुर्गा सिटी प्राईड ही वास्तू काळाच्या पडद्याआड जात आहे. एकेकाळी बारामतीकरांसाठी करमणुकीचे साधन बनलेली ही वास्तू जमीनदोस्त होत असल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
पूर्वी दुर्गा टॉकीज या नावाने हे थिएटर ओळखले जात होते. अलीकडेच नव्याने काही सुधारणा करत दुर्गा सिटी प्राईड या नावाने ही वास्तू उभी राहिली होती. दर्शनी भागात असणारी नृत्यमुद्रेतील सुंदरी हे या इमारतीचे वैशिष्ट्य होते. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ती जमीनदोस्त केली गेली. बारामतीसह परिसरातील अनेकांचे या थिएटरने एकेकाळी मोठे मनोरंजन केले.