पुणे : मंडळांचे सहकार्य मोलाचे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता | पुढारी

पुणे : मंडळांचे सहकार्य मोलाचे : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पहिल्या मानाच्या गणपतींना मिरवणुकीत उतरण्यासाठी वेळ लागला. मात्र, शेवटी मिरवणुकीचा वेळ थोड्या फरकाने लांबला असला, तरी पुण्यातील मंडळांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी विसर्जन मिरवणुकीसाठी 29 तास लागल्याचा दावा केला. मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी थोडा वेळ लागला, तरी इतर सर्व गणेश मंडळांचे विसर्जन वेळेत झाले.

पोलिस गुरुवारी (दि.8) रात्री दहा वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीच्या कर्तव्यावर हजर होते, तर मिरवणुकीचा बंदोबस्त शनिवारी सायंकाळी पावणेपाचपर्यंत होता. पावणेपाच वाजता मिरवणूक संपल्याचे घोषित केले.ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या गणेश मंडळांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. दरम्यान मिरवणुकीला प्रारंभ झाल्यापासून पोलिस आयुक्त सकाळी रस्त्यावर उतरले होते.

डीजेसमोर पोलिसांनीही धरला ठेका
टिळक चौकातून बहुतांश मंडळे विसर्जनासाठी घाटाकडे मार्गस्थ झाल्यानंतर अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील, भाग्यश्री नवटके, राहुल श्रीरामे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कर्मचारी यांनी हिंदी व मराठी गाण्यांवर डीजेसमोर ठेका धरून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला.

Back to top button