उद्धव ठाकरे यांचा केवळ गट, चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन | पुढारी

उद्धव ठाकरे यांचा केवळ गट, चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  उद्धव ठाकरे यांचा केवळ गट राहिला असून, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका करताना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम जोमाने सुरू असून, आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला बहुमत मिळाले, मात्र दगाफटका झाला, धोकेबाजी झाली, ती जनतेने पाहिली आहे. त्यामुळे अशी चूक पुन्हा होणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल होईल. जनता आमच्या पाठीशी होती आणि आहे.

पक्ष संघटना मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना त्रास देणे असा होत नाही. आम्ही संघटन मजबूत केलेली जागा उद्या शिंदे यांच्याकडे गेली तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून ताकद आणि पाठबळ मिळेल. जेव्हा जागा ते लढवतील, त्या निवडून आणण्याची जबाबदारी भाजपचीही आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना चुकीच्या मार्गाने महागडी वीज खरेदी केली. गेल्या पाच महिन्यांतील वसुली पुढील पाच महिन्यांत होणार आहे. त्यामुळे वाढीव बिले भरावी लागणार आहेत, ते महाविकास आघाडीच्या सरकारचे पाप आहे. काँग्रेस पक्षाला शेवटची घरघर लागली असून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा फुसका बार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मनसेशी युतीबाबत चर्चा नाही
मनसेशी युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज तशी कोणतीही चर्चा झालेली नाही, मात्र दिवस पुढे जातील तशा चर्चा होत राहतील, असे ते म्हणाले.

बारामतीकर मोदींनाच साथ देतील
आमचे मिशन मुंबई किंवा मिशन बारामती असे नाही, आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने लढणार आहोत असे सांगताना ते म्हणाले, भारत निर्माणच्या पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील. कुणाच्या पायाखालची वाळू सरकेल ते 2024मध्ये कळेल, असा टोला त्यांनी लगावला.

Back to top button