‘त्या’ पबला अखेर पोलिसांचा दणका!‘पुढारी’च्या वृत्तानंतर कारवाईसाठी सरसावले | पुढारी

‘त्या’ पबला अखेर पोलिसांचा दणका!‘पुढारी’च्या वृत्तानंतर कारवाईसाठी सरसावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नियमांना तिलांजली देत डीजेचा दणदणाट करत, मद्याच्या झिंगाटात पहाटे पाचपर्यंत तरुणाईला थिरकायला लावणार्‍या कोरेगाव पार्कातील हॉटेल रोव्ह अर्थात प्लन्ज या पबवर अखेर प्रशासनाने कारवाई केली. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे सोमवारी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आर्थिक जमाबेरीज करून पहाटेपर्यंत हॉटेल,पब चालवणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दैनिक ‘पुढारी’ने रविवारी (दि.4) हे पुणे आहे की बँकॉक? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून शहरातील पबमध्ये सुरू असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता.

शहरातील अनेक पब पहाटे पाच वाजेपर्यंत कसे अवैधपणे मद्याची विक्री करून, डीजेचा दणदणाट करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तेथील स्थानिक नागरिकांनीदेखील दैनिक ‘पुढारी’कडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत चोवीस तासांच्या आत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग व राज्य उत्पादन शुल्कने संयुक्त कारवाई करीत,‘प्लन्ज’ला दणका दिला.

रात्रीच्या वेळी पोलिस तपासणीसाठी आले की पब बंद असल्याचे दाखवले जात होते. मात्र, पोलिस परत जाताच मद्यधुंतीत रात्र जागवली जात असे. पहाटेपर्यंत तेथे मिळणार्‍या खास सेवेमुळे साहजिकच अनेकांचा ओढा तेथे होता. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालासुद्धा तेथील मालक कर्मचारी असाच गुंगारा देत होते. प्लन्ज हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकाराचा लेखाजोखाच मांडला होता. त्यानुसार पथकांनी सोमवारी तेथे धडक दिली.

त्यांच्याकडे चौकशी केली असता, सुरुवातीला तेथील व्यवस्थापनाने असा कोणताच प्रकार सुरू नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी मागील दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शनिवारच्या फुटेजमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पब (हॉटेल) चालू असल्याचे दिसून आले. तसेच, इतर अनेक त्रुटीदेखील आढळून आल्या. त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक वीरेंद्रसिंह चौधरी यांनी संयुक्त रिपोर्टसह पंचनामा करून याबाबत कारवाई केली आहे. हा कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरातील नामांकित हॉटेल ‘युनिकॉर्न’ आणि ‘एलरो पब’वर कारवाई केली असून, मद्यविक्री परवाना स्थगित केला आहे. ‘ड्राय डे’ असताना मद्यविक्री सुरू ठेवण्यासह परवाना देताना घालून दिलेल्या अनेक तरतुदींचे उल्लंघन झाल्याने या दोन्ही बड्या हॉटेल, पबला टाळे ठोकण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, कर्मचारी अजय राणे, मनीषा पुकाळे, अजय राणे, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली.

 

Back to top button