
देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव येथील माऊली सोसायटी, भीमाशंकर सोसायटी, सद्गुरू सोसायटी, विश्वगाथा सोसायटी, अभंग सोसायटी या परिसरामध्ये गेली चार दिवसांपासून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. ऐन गणेशोत्सवामध्ये झालेल्या अंधारामुळे नागरिक संतप्त झाले होते. सुमारे अडीचशे नागरिकांनी महावितरणच्या देहू येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात महावितरणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मात्र, पोलिस यंत्रणा तात्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, बांधकाम सभापती योगेश काळोखे, विनोद जोशी, अनिल काळे, शरद पवार यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना नगराध्यक्षा चव्हाण यांनी निवेदन दिले. त्यानंतर महावितरणाचे चौधरी यांनी परिसराची पाहणी केली. महावितरणाकडून विद्युत केबल उपलब्ध न झाल्याने नादुरुस्त केबल तात्पुरते जोड लावले जात असल्याने वारंवार नादुरुस्त होत आहे. गणेशोत्सव असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नगरपंचायतीच्या वतीने तत्काळ 140 मीटर लांबीची सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे विद्युत केबल उपलब्ध करून महावितरणला देण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांकडून विद्युत केबल टाकण्याचे काम करण्यात आले.