अतिवृष्टीच्या संकटात बळीराजाच्या पाठीशी: शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आश्वासन | पुढारी

अतिवृष्टीच्या संकटात बळीराजाच्या पाठीशी: शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आश्वासन

मंचर; पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टीमुळे मंचर परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात बळीराजाच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. मंचरमधील मोरडेवाडी, बाणखेलेमळा, शेवाळवाडी बायपास आदी ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात शेतात पाणी घुसले. अनेक ठिकाणी शेताचे बांधही वाहून गेले, पिकांची नासाडी झाली. तसेच अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून मोठे खड्डे झाले.

सर्व परिस्थितीची आढळराव पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिवसेना पदाधिकार्‍यांसोबत पाहणी केली. धनेश मोरडे, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, स्वप्निल बेंडे ,ग्राहक संरक्षण कक्ष उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, युवासेना उपजिल्हाधिकारी कल्पेश बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, शिवसेना विभागप्रमुख संतोष मोरडे, माजी भैरवनाथ पतसंस्था संचालक योगेश बाणखेले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोरडेवाडी भागात पूर्वी असलेल्या ओढापात्राची रुंदी वाढवून येथे साठणारे मैला व सांडपाणी आदींचा बंदिस्तपणे निचरा करण्यासाठी विठ्ठल मंदिर ते नवी आळीमध्ये ड्रेनेजव्यवस्था करण्याबरोबरच बायपास रोडला पाण्याचा प्रवाह आणि उपमार्ग करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मोरडेवाडीकरांना पाटील यांनी सांगितले. शेवाळवाडी बायपासचे काम करणार्‍या ठेकेदारास सूचना दिल्या. तालुका व जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीच्या पंचनाम्याबरोबर सदर प्रस्ताव मंजुरीसाठी तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

Back to top button