पिंपरी : बाप्पासमोर दरवळतोय सुगंध | पुढारी

पिंपरी : बाप्पासमोर दरवळतोय सुगंध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात सर्वत्र गणेशोत्सवामुळे वातावरण मंगलमय झाले असून, बाप्पा समोर विविध अगरबत्तींचा दरवळ रहावा, यासाठी भक्तगण अगरबत्ती, धूप, कापूर इत्यादी साहित्याची खरेदी करत आहेत. पाच फूट लांबीच्या अगरबत्तीस मंडळांकडून अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. गणेशोत्सवात फळांसोबतच देवासमोर सुगंध दरवळावा या साठी अनेकजण विविध प्रकारातील अगरवत्ती खरेदी करत आहोत. त्यामध्ये ओला धूप, लोबन तसेच केवडा, चमेली, चंदन आदी सुवासिक उदबत्ती खरेदी करण्यास पसंती देत आहेत.

गौरी धूप
बाजारांमध्ये गोमयपासून बनविलेले धूप विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचाही सुगंध उत्तम असल्याने नागरिकांची गौरी धुपास मागणी अधिक आहे.

बकूर धूप हा प्रकार बाजारात नव्यानेच आला असून, सच्छिद्र चिनीमातीच्या भांड्यात मेणबत्ती दिवा ठेवून त्यावर बकूर सुगंधी पावडर टाकली जाते. त्यामुळे सर्वत्र सुगंध दरवळतो. जास्मीन, कापूर, रोझ आदी सुगंधी प्रकारातील उदबत्तीलाही मागणी आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे सार्वजनिक उत्सवावर शासनाने बंदी घातली होती, त्यामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र, यावर्षी निर्बंध उठल्यामुळे मोठ्या उत्साहात सण साजरे होत आहेत. परिणामी धूप, अगरबत्ती आणि कापूरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, एरवीपेक्षा दुप्पट प्रमाणात त्याची विक्री होत आहे.
                                                                       – अगरबत्ती विक्रेता, पिंपरी.

पाच फुटांची अगरबत्ती
पाच फूट लांब असलेली सुगंधी द्रव्ययुक्त अगरबत्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. शहरातील बर्‍याच गणेश मंडळांनी याची खरेदी केल्याची माहिती विक्रेते देत आहेत. साधारणत: चोवीस तास ही अगरबत्ती जळते. (एक दिवस) सुरू राहणारी ही अगरबत्ती असून, त्याची किंमत 500 रुपये एवढी आहे.

Back to top button