पुणे शहरात कमी वेळेत मुसळधार | पुढारी

पुणे शहरात कमी वेळेत मुसळधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे शहर आणि परिसरात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पंधरा- वीस मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहर परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शहर आणि परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून दिवसाआड संध्याकाळच्या वेळी जोरदार पाऊस हजेरी लावीत आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडली, तर गणेश मंडळांचे देखावे सादर करण्याची तयारी करणार्‍या पदाधिकारी व कार्यकत्र्यांची सुरू झालेली घाई थांबली. पंधरा ते वीस मिनिटे मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले तर काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे डबकी साठली.

शहरात सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कमाल तापमानाचा पारा 34 ते 35 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे . त्यामुळे ऐन सप्टेंबर महिन्यात म्हणजेच पावसाळ्याच्या दिवसात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शहरातील कमाल तापमानात अचानक जोरदार उसळी मारली.

वास्तविक पाहता या कालावधीत पाऊस असल्यामुळे कमाल तापमानाचा पारा 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली. अगदी सकाळपासूनच कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. पुणे वेधशाळाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान 30 ते 33 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Back to top button