पुणे : एसटीच्या शंभर कंत्राटी चालकांना घरी बसविले | पुढारी

पुणे : एसटीच्या शंभर कंत्राटी चालकांना घरी बसविले

पुणे : संपकाळात एसटीच्या पुणे विभागात कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आलेल्या 100 चालकांना एसटी महामंडळाने घरी बसविले आहे. त्यांचे कंत्राट संपल्याचे कारण देत एसटी महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे चालकांवर आता बेरोजगार होण्याची वेळ आली असून, चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार (दि. 3) पासून कंत्राटी चालकांची सेवा एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील 100 कंत्राटी चालकांचा यात सहभाग आहे.

एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी संपाची हाक दिली होती. संप काळात राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाने टप्प्या-टप्प्याने राज्यभरात एकूण 800 चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती. सुरुवातीला चार महिन्यांसाठी चालकांची कंत्राटी नियुक्ती करण्यात आली होती. पण, संप सुरूच राहिल्यामुळे पुन्हा त्यांना मुदतवाढ देण्यात आली. संपकरी कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपासून कामावर रूजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू झाले.

Back to top button