‘कात्रज’च्या मोदक, पेढे, मिठाईसह अन्य उत्पादनांच्या खरेदीस रांगा | पुढारी

‘कात्रज’च्या मोदक, पेढे, मिठाईसह अन्य उत्पादनांच्या खरेदीस रांगा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीची विविध उत्पादने चोखंदळ पुणेकर ग्राहकांच्या पसंतीस पडली असून, पार्लरवर खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. गतवर्षी गणेशोत्सवात कात्रज मोदक, पेढ्यांची वीस टन व अन्य मिठाईची पाच टन विक्री झाली होती. यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोदक, पेढे व अन्य मिठाईची मिळून सुमारे साडेसतरा टन इतकी उच्चांकी विक्री झाल्याची माहिती संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक संजय कालेकर यांनी दिली.

कात्रज डेअरीची कात्रज मोदक, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मँगो बर्फी व काजूकतली या उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या वर्षी संघाने पेढे व इतर सर्व मिठाई 100 ग्रॅम पॅकिंग आकारात ग्राहकांसाठी उपलब्ध केलेले आहेत. 21 मोदकांच्या बॉक्सची किंमत रु. 100 रुपये, 11 मोदकांच्या बॉक्सची किंमत 60 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येकी 250 ग्रॅम बॉक्समध्ये पेढे 250 रुपये, मलई बर्फी 160 रुपये, मँगो बर्फी 160 रुपये, काजुकतली 235 रुपये, अंजीर बर्फी 210 रुपये, कलाकंद 140 रुपये याप्रमाणे दर आहेत.

तसेच, 100 ग्रॅम बॉक्समध्ये पेढे 60 रुपये, मलई बर्फी 75 रुपये, मँगो बर्फी 75 रुपये, काजुकतली 100 रुपये, अंजीर बर्फी 100 रुपये, कलाकंद 75 रुपये, असे दर आहेत. कात्रज डेअरीची श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी ही उत्पादने देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांची सहकारी संस्था असून, संघाने आयएसओ 22000:2018 व 14001:2015 ही प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत.

ग्राहकांकडून खरेदीसाठी उत्साह
मागील दोन वर्षे कोरोना स्थितीमुळे गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे मागणी नव्हती. कोरोना साथ ओसरल्यानंतरचा पहिलाच गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असल्याने कात्रजच्या उत्पादनांना नेहमीपेक्षा दुपटीहून अधिक मागणी सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून चालू वर्षी मोदक, पेढे व मिठाईची मिळून सुमारे 35 ते 40 टन इतकी उच्चांकी विक्री अपेक्षित असल्याची माहितीही कालेकर यांनी दिली.

Back to top button