पुणे : विद्येच्या देवतेला ‘पुस्तकांचा’ नैवेद्य | पुढारी

पुणे : विद्येच्या देवतेला ‘पुस्तकांचा’ नैवेद्य

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : गणपती बाप्पा अर्थात विद्येची देवता आणि पुस्तके हे विद्येचे, ज्ञानाचे माध्यम! पुस्तके छोटी असली तरी त्यात संपूर्ण जग सामावलेले असते. पुस्तके आपली ज्ञानाची भूक भागवतात, या विचारातून अरण्येश्वरनगर येथील एकता मित्रमंडळाने यंदा ऋषिपंचमीनिमित्त बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण केला. उत्सवांनिमित्त अनेकदा ‘अन्नकोट’ आयोजला जातो. या वेळी जय गणेश व्यासपीठातर्फे ज्ञानाची भूक भागविण्यासाठी ‘पुस्तक कोट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठाच्या माध्यमातून ठरल्याप्रमाणे अनेक गणेशभक्तांतर्फे एकता मित्रमंडळाच्या (ट्रस्ट) श्रींना पुस्तकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

नैवेद्यात अर्पण करण्यात आलेली पुस्तके एकता स्वामी विवेकानंद ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी उपयोगी ठरणार आहेत. तसेच, या पुस्तकांचे गरजू, वंचित, शहर व ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. पर्वती विभागातून एकता मित्रमंडळाने या उपक्रमात सहभाग घेतला. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांची, गोष्टींची, सामान्य ज्ञानाची पुस्तके घेत मंडळाच्या लाडक्या बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण केला. मंडळातर्फे या उपक्रमात नागरिकांनी एका पुस्तकाचा तरी नैवेद्य दाखवून नक्की सहभाग घ्यावा, असे आवाहन विनायक इंगवले यांनी केले आहे.

एकता मित्रमंडळाची स्थापना 1994 साली झाली. सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत मंडळाने मागील 27 वर्षांत अनेक विधायक उपक्रम हाती घेतले आणि लोकसहभागातून ते यशस्वी झाले. मंडळाने नागरी सुविधा व लोकोपयोगी सामाजिक कार्याचा योग्य विचार करीत मंडळामध्ये स्वामी विवेकानंद ग्रंथालय व अभ्यासिका, मोफत सार्वजनिक टेलिफोन व वाय-फाय सुविधा, एकता विचार कट्टा, बातमीपत्र वाचनालय, औषधोपचार पेटी, सूचना व तक्रारपेटी अशा सुविधा निर्माण केल्या आहेत.

                                                                        -सुधीर ढमाले, मंडळ प्रमुख

 

 

 

Back to top button