पुणे : आव्वाज ढोल-ताशा पथकांचा; बाप्पाची थाटात निघाली मिरवणूक | पुढारी

पुणे : आव्वाज ढोल-ताशा पथकांचा; बाप्पाची थाटात निघाली मिरवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या गणेशोत्सवात फक्त न् फक्त आव्वाज कोणाचा, फक्त ढोल-ताशा पथकांचा, याची अनुभूती पुणेकरांना आली…पारंपरिक वेशभूषेत मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पथकातील वादकांनी बेधुंद वादन केले अन् त्या ठेक्यावर लोकांनीही थिरकायची संधी सोडली नाही…विशेष म्हणजे मंडळांच्या मिरवणुकीत खासकरून पथकांनी पुणेकरांचे लक्ष वेधले. पथकातील तरुण-तरुणींच्या वादनात एक आत्मविश्वास अन् ऊर्जा पाहायला मिळाली. याच ऊर्जेने त्यांनी आपल्या वादनातून मने जिंकली. ढोल-ताशांचा ठेका अन् ध्वज पथकांत सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपल्या वादनातून निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची प्रचिती दिली.

लक्ष्मी रस्ता असो वा समाधान चौक….सर्व ठिकाणी फक्त ढोल-ताशांचा गजर निनादत होता. मिरवणुकीत सर्वाधिक संख्या ढोल-ताशा पथकांची होती…एरवी मंडळांच्या मिरवणुकीत फक्त एक ते दोन पथके असतात…आज मात्र एका मंडळाच्या मिरवणुकीत तीन ते पाच पथके सहभागी झाली होती. प्रत्येक चौकात फक्त ढोल-ताशांचा निनाद ऐकू येत होता. बेभान होऊन वादन करणारे तरुण -तरुणी अन् दोन वर्षांनंतर मिरवणूक अनुभवणारे पुणेकर असे समीकरण जुळून आले. शिवगर्जना, ताल, श्रीराम, गर्जना, नादब्रह्म, समर्थ प्रतिष्ठान, अशा विविध पथकांतील तरुणाईने आपल्या वादनाने यंदाची गणेश आगमनाची मिरवणूक गाजवली.

फक्त तरुणाईच नव्हे तर यंदा पथकांत काही ज्येष्ठ मंडळींचाही सहभाग दिसला अन् मिरवणुकीत प्रत्येकाने पारंपरिक वेशभूषेत अन् पथकाच्या गणवेशात लोकांना तालावर नाचायला भाग पाडले. पथकांचे वादन पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती. कोणी कॅमेर्‍यात आणि मोबाईलवर पथकांच्या वादनाची छायाचित्रे टिपत हा क्षण बंदिस्त केला. यंदा वादनात सर्वाधिक लक्ष वेधले ते महिला युवतींनी…देखणी वेशभूषा आणि देखणे वादन हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. जिथे पाहाल तिथे पथकांचे वादन होते. दोन वर्षांनंतर तो ठेका पुणेकरांना ऐकता आला. पुण्याच्या मिरवणुकीचा अविभाज्य भाग असलेल्या ढोल-ताशा पथकांचे वादन उत्कृष्ट ठरले.

बँड पथकांनीही जिंकली मने…
ढोल-ताशा पथकांचे वादन लक्षवेधी होतेच, पण बँड पथकांच्या सुरेल वादनानेही पुणेकरांची मने जिंकली. यंदा पथकांसह बँड पथकांचाही मिरवणुकीत सहभाग होता. प्रत्येक वादकाने ऊर्जेने अन् आपल्या उत्कृष्ट वादनाने ’हम किसीसे कम नहीं ’ हे दाखवून दिले. पारंपरिक बँड पथकांच्या वादनाचा निनादही पुणेकरांना सुखावून गेला.

Back to top button