पुणे : शेतकरी देताहेत मुरघासावर भर | पुढारी

पुणे : शेतकरी देताहेत मुरघासावर भर

उंडवडी, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी मुरघास करू लागल्याने चारा व वेळ या दोन्हींची बचत होत आहे. मुरघास म्हणजे हवाविरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय.

या पद्धतीत हवाविरहित अवस्थेमध्ये जगणार्‍या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या मकेत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होते. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो, तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतात. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.

मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे. दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चांगला उपयोग होतो. रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील वेळ व कष्ट वाचतात. मुरघास जास्त दिवस टिकून ठेवता येतो. हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात तो वापरता येतो. उपयुक्त व पौष्टिक मका व गूळ यांचा वापर मुरघासात केल्याने प्रथिने व कॅरोटीनचे प्रमाण मुरघासात जास्त असते. मुरघासात तयार होणारे लॅक्टिक आम्ल हे गायी-म्हशींच्या पचनेंद्रियात तयार होणार्‍या रसासारखे असल्याने तो पचण्यास सोपा असतो, तसेच यामुळे जनावरांची भूक वाढते, ते जास्त खातात. वाया घालवत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सौम्य रेचक असतो. वाळलेल्या चार्‍याच्या पौष्टिकतेच्या तुलनेत मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.

दुग्धोत्पादनात वाढ

मुरघासाकरिता मका पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्ये चार्‍यामध्ये येतात. हिरव्या मक्याचा मुरघास तयार करून हा मुरघास टंचाईच्या काळामध्ये पाहिजे तेव्हा वापरता येतो. पावसाच्या पाण्यावर चार्‍यासाठी अवलंबून असणार्‍या भागात पावसाळ्यामध्ये तयार झालेल्या हिरव्या चार्‍याचा मुरघास करून तो उन्हाळ्यामध्ये वापरता येतो. मुरघास तयार केल्यास चार्‍यावर होणारा खर्च कमी होतो, शिवाय दुग्धोत्पादनातही वाढ होत बसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मुरघास करण्यावर भर देत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Back to top button