पुणे : भोरमधील वाहतूक कोंडी सुटणार | पुढारी

पुणे : भोरमधील वाहतूक कोंडी सुटणार

भोर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या नागरिकरणामुळे नगरपालिका चौक ते एस स्टँडपर्यंत वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भविष्यात या रस्त्याचे रुंदीकरण तसेच पर्यायी अविनाश जगताप ते रावळ चौक पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याने लवकरच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शेटेवाडी) ते महाड नाका रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्वप्नलोक सोसायटी जवळील बाजारपेठेच्या मागील बाजूच्या सांगळे घर ते मुख्य रस्त्याला जोडणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन आ. थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपाताई थोपटे, भोर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा गीतांजली शेटे, उपनगराध्यक्ष चंद्रकात मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, भोर शहर काँग्रेस अध्यक्ष गजानन दानवले, गजानन शेटे आदी या वेळी उपस्थित होते.

आहे तेथे समाधानी…

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भोर विधानसभा मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याचा वेगळाच अर्थ काढून वावड्या उठवल्या गेल्या. मी माझ्या जागेवरच असून कोठेही जाणार नाही. आहे त्या ठिकाणी समाधानी असल्याचे सांगून आ. संग्राम थोपटे यांनी पक्षांतराचा विषय खोडून काढला.

Back to top button