पुणे : महाळुंगे बैलगाडा घाट बांधकामासाठी 10 लाखांचा निधी | पुढारी

पुणे : महाळुंगे बैलगाडा घाट बांधकामासाठी 10 लाखांचा निधी

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून महाळुंगे पडवळ येथील बैलगाडा घाट बांधकामासाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊ, असे बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी सांगताच हजारो उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील श्रावणी बैलपोळ्यानिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाडा प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर, विश्व हिंदू परिषदेचे तालुका उपाध्यक्ष गणेश गाडे, भाजप राज्य युवा कार्यकारिणी सदस्य सुशांत गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अजय आवटे, शरद बँकेचे संचालक के. के. सैद, डॉ. दत्ता चासकर, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, दूध संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश सोलाट, सरपंच सुजाता चासकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष याकूबभाई इनामदार आदींसह शेकडो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

या वेळी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, महाळुंगेच्या प्रसिद्ध कुस्ती आखाडा बांधकामासाठी मी खासदार असताना दहा लाख रुपये निधी दिला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर उदारमळा व मातंगवस्तीसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये दिले आहेत. अजून 15 लाख रुपयांची तरतूद हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या संरक्षक भिंतीसाठी करतो आहे. आखाड्याच्या उर्वरित कामासाठी निधीची पूर्तता करणार आहे.

कुस्त्यांच्या आखाड्यासाठी नगर, औरंगाबाद, शिर्डी, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, ठाणे, छत्तीसगड येथील नामवंत पैलवान येथे आले होते. विजेत्या पैलवानांना रोख बक्षिसे वितरित करण्यात आली. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी हुतात्मा बाबू गेनू चौकात कलगी-तुर्‍याचा सामना रंगला. रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती सलग दोन दिवस होती, तर सीमा पोटे प्रस्तुत ‘ही नार नखर्‍याची‘ या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला तरुणांनी बेधुंद नाचत दाद दिली. सलग तीन दिवस चाललेल्या यात्रेची सांगता न्यू भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळ साकोरे यांच्या सेवेने झाली.

Back to top button