‘राज्यसेवा’ मुलाखतीसाठी 1,279 उमेदवार पात्र; सर्वाधिक 903 उमेदवार पुणे केंद्रावरील | पुढारी

‘राज्यसेवा’ मुलाखतीसाठी 1,279 उमेदवार पात्र; सर्वाधिक 903 उमेदवार पुणे केंद्रावरील

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण 1 हजार 279 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून, त्यात सर्वाधिक 903 उमेदवार पुणे केंद्रावरील आहेत.
आयोगामार्फत 7 ते 9 मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालासह पात्रता गुणही (कटऑफ) आयोगाने जाहीर केले. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

एकूण 1 हजार 279 उमेदवारांपैकी पुणे विभागीय केंद्रातून सर्वाधिक 903 उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले, तर औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर 87, नाशिक 77, मुंबई 75 आणि अमरावती केंद्रातून 24 उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्रता गुण आणि पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेत पात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांनी दहा दिवसांत अर्ज करावा, असे सांगण्यात आले.

 

 

 

Back to top button