पुणे : भिंत फोडून मद्याचे बॉक्स चोरणारे जेरबंद; 49 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

पुणे : भिंत फोडून मद्याचे बॉक्स चोरणारे जेरबंद; 49 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: फुरसुंगी येथील एका गोडाऊनची भिंत फोडून नामांकित कंपनीच्या मद्याचे 25 लाख 43 हजार रुपये किमतीचे 302 बॉक्स चोरी करणार्‍या चोरट्यांना हडपसर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अटक केली. चोरीसाठी वापरलेली दोन वाहने व 9 लाख 26 हजार रुपये किमतीचे 110 मद्याचे बॉक्स, असा 49 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर (वय 26, रा.उकडगाव, ता. बार्शी), सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तूद (वय 28, रा. पांगरी, ता. बार्शी), तानाजी भागवत चौघुले (वय 38, रा. पारडी, ता. बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा अन्य एक साथीदार बिभीषण काळे (रा. कन्हेरपाटी, ता. कळंब) हा फरार आहे. काळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी, सरकारी कर्मचार्‍यावर हल्ला, असे 9 गुन्हे दाखल आहेत. त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने ही चोरी केली होती.

…असा लागला चोरीचा छडा
फुरसुंगी परिसरातील एका मद्याच्या गोडाऊनची भिंत फोडून मद्याच्या बॉक्सची चोरी केल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल होता. ही घटना 8 ऑगस्ट रोजी घडली होती. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी गोडाऊनमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरी केला होता. दरम्यान, तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास करत असताना, ही चोरी बिभीषण काळे याने त्याच्या साथीदाराच्या साथीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासाठी पोलिसांनी उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांत जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे आदींच्या पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.

दिवसा रेकी अन् रात्री चोरी
बिभीषण काळे याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन मद्याचे गोडाऊन उलटण्याचा डाव रचला. त्यानुसार 30 जुलै रोजी काळे हा फुरसुंगी येथे येऊन रेकी करून गेला. ठरल्याप्रमाणे 6 ऑगस्ट रोजी सर्वजण पुण्याकडे आले. त्या दिवशी चौफुला दौंड येथे ते ढाब्यावर थांबले. त्यानंतर काळे हा दुपारच्या वेळी परत गोडाऊनची पाहणी करण्यासाठी आला. परिस्थिती पाहून त्यांनी रात्री गोडाऊन फोडून मद्याचे बॉक्स भिंतीलगत ट्रक लावून चोरी केले.

दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
चोरट्यांनी चोरी करताना गोडाऊनमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरी केला होता. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या वेळी एका कॅमेर्‍यात चोरट्यांची गाडी कैद झाल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने तपासाची सूत्रे गतिमान करत आरोपींच्या गावात धडक देऊन त्यांना पकडले.

Back to top button