पुणे : मान्सून 15 दिवस आधीच परतणार; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच परतीचा प्रवास | पुढारी

पुणे : मान्सून 15 दिवस आधीच परतणार; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच परतीचा प्रवास

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या सर्वच भागांत मान्सूनने गेल्या तीन महिन्यांत जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्व भाग आता पाणीदार झाला आहे. मान्सूनचा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजस्थानच्या पश्चिम भागापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तो सरासरी सप्टेंबर महिन्याच्या 16 किंवा 17 तारखेपासून सुरू होतो. यंदा मात्र हा प्रवास 15 दिवस आधीच सुरूच होणार आहे.

यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे वेळेतच आगमन झाले होते. त्यानंतर पुढील प्रवास अनुकूल वातावरणामुळे जोरदार झाला आणि वेळेतच संपूर्ण देश व्यापला. अर्थात बंगालच्या उपसागरात जून महिन्यात पाऊस पडण्यासाठी पाहिजे, त्या प्रमाणात कमी दाबाचे पट्टे तयार झाले नाहीत. त्यामुळे या महिन्यात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वाढले. त्यामुळे सलग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी जून महिन्यामधील पावसाची सरासरी अगदी काही दिवसांतच जुलै महिन्यात भरून निघाली.

या वर्षी मध्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतामधील सर्वच राज्यांत मान्सून मनसोक्त बरसला. त्यामुळे सर्वच भाग पाणीदार झाला आहे. राजस्थान भागातही पावसाने मुसळधार हजेरी लावली. आता मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. एरवी मान्सून सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होतो. मात्र अनुकूल स्थितीमुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान पाऊस पुन्हा सक्रिय
राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून थांबलेला पाऊस आता मात्र पुन्हा सक्रिय होणार आहे. गणेशोत्सवात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांत पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे.

Back to top button