पुणे : वरुडे-पाबळ रस्त्याची दुरवस्था | पुढारी

पुणे : वरुडे-पाबळ रस्त्याची दुरवस्था

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : दोन तालुक्यांना जोडणार्‍या वरुडे -पाबळ रस्त्याची पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाने खड्ड्यांमध्ये व खचलेल्या साईडपट्ट्यांत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

वरुडे -पाबळ हा खेड व शिरूर या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर काही ठिकाणी नळ्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन खड्डे पडले आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. पावसाळ्यात खड्डे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच अनेक ठिकाणी साईडपट्ट्यादेखील पूर्णपणे उखडल्या आहेत. पावसाने या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. पाबळजवळ असलेल्या वस्तीजवळ रस्त्यावर खड्ड्यामध्ये व उखडलेल्या साईडपट्ट्यामध्ये पाणी साचले आहे. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी शेतीच्या पाइपलाइन खोदल्या आहेत त्या व्यवस्थित न बुजवल्याने त्या ठिकाणी अपघात झाले आहेत.

या भागातून शिक्रापूर व रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रात कामासाठी दररोज जाणारे कामगार व शिरूर परिसरात कामानिमित्त जाणारे शेतकरी, नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून पाबळ येथील विद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दररोज जावे लागते. त्यांना या खराब रस्त्याचा त्रास होत आहे. बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वरुडेचे सरपंच मारुती थिटे व ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button