आवाज वाढीव डीजे…येणार अंगलट ! पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचा कारवाई करण्याचा इशारा

आवाज वाढीव डीजे…येणार अंगलट ! पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचा कारवाई करण्याचा इशारा
Published on
Updated on

पिंपरी : 'आवाज वाढीव डीजे तुला आईची शपथ हाय' असे म्हणत कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस 'डीजे' चालकांच्या अंगलट येणार आहे. कारण पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नियमभंग करणार्‍या डीजे चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील सुपार्‍या डीजेचालकांना आवाजाची मर्यादा पाळूनच वाजवाव्या लागणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचा उत्साह आहे. सार्वजनिक गणेशमंडळांनी देखील जय्यत तयारी केली आहे. यातच महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने मंडळांकडे वर्गणी देखील मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीचे मोठे नियोजन केले आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच तांत्रिक बाबींवर पोलिसांनी भर दिला आहे. महापालिकेच्या माध्यमातून मिरवणूक मार्गांवर तसेच गर्दीच्या ठिकाणी तात्पुरते सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. याव्यतिरिक्त परिमंडळ एक आणि दोनच्या हद्दीत ड्रोनच्या घिरट्या राहणार आहेत. सर्व्हेलन्स व्हॅनमध्ये याचे थेट प्रेक्षपण सुरु राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व मंडळांना आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. शहर परिसरातील डीजेचालक आवाजाची मर्यादा पळत नसल्याच्या तक्रारी पोलिसांकडे यापूर्वी आल्या आहेत. त्यामुळे नियमभंग करणार्‍या डीजेवाल्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी "नॉईस" मीटर (आवाजाची पातळी तपासणारे यंत्र) उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, आवाजाची पातळी तपासण्यासाठी पथक तैनात करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे डीजे चालकांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सवात सीसीटीव्ही, ड्रोन आदींच्या माध्यमातून पोलिसांचा वॉच राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. उत्सवात अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आवश्यक ती खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच, आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍याची गय केली जाणार नाही. नियमभंग करणार्‍या डीजे चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत.
                                            -अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news