पिंपरी : अवयवदानातून 15 रुग्णांना मिळाले नवजीवन | पुढारी

पिंपरी : अवयवदानातून 15 रुग्णांना मिळाले नवजीवन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे 4 मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांच्या अवयवदानातून व नातेवाईकांच्या धाडसी निर्णयामुळे 15 रुग्णांना नवजीवन मिळाले. दात्यांच्या अवयवदानातून 1 हृदयासह फुप्फुस, 1 हृदय, 1 फुप्फुस, 4 यकृत, 4 मूत्रपिंड, 4 नेत्रपटल, अशा 15 अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. 21 वर्षीय युवतीला मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदू मृत घोषित करण्यात आला. तिच्या अवयवदानातून एक यकृत पुण्यातील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. हे अवयवदान 15 ऑगस्टला करण्यात आले.

26 वर्षीय युवतीला ब्रेन हॅमरेज होऊन तिला मेंदू मृत घोषित करण्यात आले. तिच्या अवयवदानातून 1 हृदयासह फुप्फुस (दुहेरी प्रत्यारोपण) 37 वर्षीय महिलेला, यकृत 65 वर्षीय पुरुषाला तर, एक मूत्रपिंड 17 वर्षीय तरुणाला देण्यात आले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. दुसर्‍या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये करण्यात आले. प्रतीक्षा यादीनुसार दोन नेत्रपटल गरजू रुग्णांसाठी देण्यात येतील.

हे दुसरे अवयवदान 20 ऑगस्टला करण्यात आले. 68 वर्षीय पुरुषाला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्यांचे यकृत खासगी रुग्णालयातील रुग्णाला प्रत्यारोपित केले. हे तिसरे अवयवदान दि. 23 रोजी करण्यात आले. चिखली येथील एका 24 वर्षीय युवकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय हे सुरत (गुजरात) येथील रुग्णालयातील 35 वर्षीय पुरुषास प्रत्यारोपित केले.

फुप्फुस हैदराबाद येथील रुग्णालयातील 60 वर्षीय पुरुष रुग्णाला प्रत्यारोपित केले. तर यकृत 65 वर्षीय महिला व मूत्रपिंड 33 वर्षीय पुरुषास डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पुण्यातील शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपित केले. प्रतीक्षा यादीनुसार दोन नेत्रपटल गरजू रुग्णांना देण्यात येतील. चौथे अवयवदान बुधवारी (दि.24) करण्यात आले.

रुग्णांना नवसंजीवनी देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. रस्ते मार्ग, वायू मार्ग या ग्रीन कॉरिडॉरद्वारे पिंपरी येथून विविध रुग्णालयापर्यंत अवयव पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच झेडटीसीसी पुणे विभागातील सदस्याचे सहकार्य लाभले. अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील सर्वांचे कौतुक केले.

Back to top button