पुणे : व्यावसायिकाच्या बंगल्यांवर परस्पर काढले 2 कोटींचे कर्ज; खरेदीच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पुणे : व्यावसायिकाच्या बंगल्यांवर परस्पर काढले 2 कोटींचे कर्ज; खरेदीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बंगले खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याची कागदपत्रे घेतली. त्याच्यावर बनावट सह्या करून त्याची परस्पर विक्री केली. त्यानंतर मुंबई येथील फायनान्स कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे कर्जही काढले; तसेच प्रॉपर्टी व वीजबिलावर स्वतःचे नाव लावून व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. संबंधित व्यावसायिक घराचा कर भरण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी व्यावसायिक संजय मुरलीधर बजाज (वय 62, रा. उदयबाग, घोरपडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजेंद्र भिकमचंद संचेती, गीतेश गजेंद्र संचेती, सुनील भुजबळ, जितेंद्र रामनुज जैस्वाल आणि त्रेजा रामचंद्र गिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2020 ते 4 मार्च 2022 दरम्यान घडला.

फिर्यादींच्या मालकीचे हयसिंदा सोसायटी श्रीनिवास उदयबाग बीटी कवडे रोड घोरपडी येथे 2 बंगले आहेत. हे बंगले त्यांना विक्री करायचे होते. बंगले खरेदी करण्याच्या बहाण्याने संचेती व इतरांनी कर्ज प्रकरणाची चौकशी करायची आहे, असे सांगून मालमत्तेची कागदपत्रे घेतली. त्यानंतर बनावट सह्या करून, तसेच त्यांच्या आधार कार्ड व पॅन कार्डमध्ये छेडछाड करून त्याद्वारे परस्पर बनावट दस्त तयार केले. फिर्यादींऐवजी एका तोतया व्यक्तीला उभे केले. त्यांची मालमत्ता परस्पर बेकायदा विक्री केली. त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट बँक खाते उघडून मुंबईतील पीएनबी हाउंसिंग फायनान्सकडून 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले; तसेच त्यांच्या मालमत्तेवर व वीजबिलावर स्वत:ची नावे लावून फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक माया गावडे तपास करीत आहेत.

…असा आला प्रकार समोर
बंगले विक्रीला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील भुजबळ हा ब्रोकर म्हणून फिर्यादींच्या घरी आला. बंगले विकून देण्याची तयारी दाखवत तो प्रताप नावाच्या व्यक्तीला घेऊन आला. त्यावेळी त्याने बंगला विकत घेण्यासाठी कर्ज मंजूर होईल की नाही, हे पाहण्याच्या बहाण्याने फिर्यादींच्या बंगल्याची कागदपत्रे, त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स घेतल्या. नोव्हेंबर 2020 मध्ये फिर्यादींना एका व्यक्तीने फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे सांगितले.

फिर्यादींनी दोघांना याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी कागदपत्रे आमच्याकडे सुखरूप असून, लॉकडाऊनमुळे कर्जप्रकरणासाठी उशीर होत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतापने राजेश शुक्ला नावाच्या व्यक्तीला आणून बंगल्याचे खरे खरेदीदार असल्याचे सांगून त्यांना काही चेक दिले. फेब्रुवारी 2021 मध्ये परत एका व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादींना भेटून तुमच्या कागदपत्राचा वापर करून फसवणूक होत असल्याचे सांगितले. दरम्यान, मार्च 2022 मध्ये फिर्यादी घराचा कर भरण्यासाठी गेले असता घराच्या टॅक्स पावतीवर गजेंद्र संचेती, गितेश संचेती यांची नावे आढळली, तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Back to top button